MGID Header Code
Code End

पिंपरी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – आम आदमी पार्टीची पोलीस आयुक्तांकडे मागणी.


पिंपरी चिंचवड : पिंपरी मार्केट परिसरात व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, काही व्यापाऱ्यांना अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्रांचा धाक दाखवून धमकावणे, रोकड लुटणे तसेच वाहनांवर जबरदस्तीने हल्ले करण्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांमुळे व्यापारी, दुकानदार, कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने कामगार आघाडीचे  कार्याध्यक्ष लक्ष्मण भगवान माने यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनामध्ये पिंपरी मार्केट परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, संबंधित संशयित व्यक्तींची चौकशी करून आरोपींचा शोध घ्यावा, धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, मार्केटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आवश्यक ठिकाणी नवीन कॅमेरे बसवावेत तसेच व्यापारी व दुकानदारांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

व्यापारी वर्ग हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, व्यापाऱ्यांनाच जर जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.असे मत आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी म्हटले.

व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी आम आदमी पार्टी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. यावेळी आम आदमी पार्टीने पोलीस प्रशासनाला या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लक्ष्मण भगवान माने

कार्याध्यक्ष, कामगार आघाडी

आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर.


थोडे नवीन जरा जुने