पिंपरी चिंचवड : सीए संस्था देशाच्या विकासात योगदान देणारी संस्था - खासदार निलेश लंके

 


निगडीत सीए दिन साजरा

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - सनदी लेखापालांची संस्था ही देशाच्या आर्थिक विकासात फार मोठे योगदान देणारी संस्था आहे. तसेच देशाच्या औद्योगिक आर्थिक विकासात मार्गदर्शन करणारी, महत्वाची भूमिका बजावणारी संस्था आहे. असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. 

निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सीए दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आयसीएआयचे केंद्रीय माजी सदस्य डॉ शिवाजी झावरे, प्रादेशिक कौन्सिलचे माजी सदस्य डॉ अशोक पगारिया, इनरव्हील क्लब निगडी प्राईडच्या अध्यक्षा कमलजीत दुलत, आयसीएआयचे शाखाध्यक्ष सीए वैभव मोदी, उपाध्यक्षा सीए सारिका चोरडिया, सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए धीरज बलदोटा, कार्यकारी सदस्य सीए शैलेश बोरे व सीए सचिन ढेरंगे आदी उपस्थित होते.

यावेळी अकौंटिंग क्षेत्रातील योगदानामुळे इनरव्हील क्लबकडून डॉ. झावरे, सीए मोदी यांना मानपत्र देवून सन्मानित केले तर सीए संस्थेकडून डॉ. पगारिया यांना मानपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी शिबिरात १५० जणांनी रक्तदान केले. प्रा नीलिमा डुंगरवाल यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रात मराठीतूनच कामकाज चालावे.

खा. लंके पुढे म्हणाले कि,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इंग्रजी कमकुवत असते. तरी सुद्धा अभ्यास करून सीए सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण होताना दिसत आहे. ही समाधानाची बाब आहे. मी स्वतः इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली. कारण इंग्रजी ज्ञानभाषा असून बहुतांशी देशवासियांना समजते.मात्र महाराष्ट्रात मराठीतूनच कामकाज चालावे. असा आमचा आग्रह आहे. 

डॉ झावरे म्हणाले कि, या सीए संस्थेच्या स्थापनेला ७७ वर्षे झाली. देशाने बरेच बदल अनुभवलेत.सीए संस्था समाज विकासाठी योगदान देत आहेच.सीएचा अभ्यास पूर्ण करून उत्तीर्ण झालेले सीए अदयाप बेरीजगार राहू शकतं नाही. सीए प्रोफेशनला जगात कुठेच मरण नाही.सीए झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक क्षेत्रामध्ये, गुंतवणूक क्षेत्रामध्ये,संगणक क्षेत्रामध्ये आणि इतर अनेक व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत.

डॉ पगारिया म्हणाले कि,  या 77 वर्षांमध्ये फक्त चार लाख चार्टर्ड अकाउंटंट घडलेत यावरून ही परीक्षा किती कठीण आहे.याची कल्पना येते. हा अभ्यासक्रम अतिशय सखोल अभ्यास करून केलेला असल्यामुळे सनदी लेखापाल यांना आर्थिक क्षेत्रातले मार्गदर्शक, आर्किटेक्ट, आणि डॉक्टर सुद्धा संबोधले जाते. व्यवसायाचा विकास करण्यासाठी सीएच्या सल्ल्याची आवश्यकता असते कारण आर्थिक नियोजन क्षेत्रामध्ये, ऑडिटच्या क्षेत्रामध्ये आणि अकाउंटिंग च्या क्षेत्रामध्ये सीए चा सल्ला अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या जैन, प्राजक्ता जोशी यांनी केले तर आभार सीए मनोज मालपाणी यांनी मानले.



थोडे नवीन जरा जुने