Alandi : संतांनी बंधुता , प्रेमभाव प्रस्थापित करून ऐक्याची शिकवण दिली ; उदागे महाराज

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : समाजाला भौतिक आणि मानसिक दृष्ट्या सुधारण्याचे काम सर्वच संतांनी केले असून बंधुता, प्रेमभाव प्रस्थापित करून ऐक्याची शिकवण दिली. या वरूनच संत साहित्याची समाजाप्रती उपयोगिता लक्षात येते असे प्रतिपादन ह.भ.प.गोरक्षनाथ महाराज उदागे यांनी केले.

  शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आळंदी देवाची येथे आयोजित दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्य संमेलनात ते बोलत होते. या प्रसंगी उद्योजक फकीरा पवार, डॉ.कमलकांत वडेलकर, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभाग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.संदीप सांगळे, किसनराव घुले, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चोभे यावेळी विचार पीठावर उपस्थित होते.

   संत साहित्याची समाजाप्रती उपयोगिता या विषयावरील परिसंवादात बोलतांना ते पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया  रचला  तर संत तुकोबारायांनी त्यावर कळस चढवला, पैठण वरून शुद्धिपत्र घेऊन येताना वाटेत श्रीक्षेत्र नेवासा इथे पैसा खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. त्यावेळी प्राकृत भाषेतील मराठीला बोली भाषेचे रूप प्राप्त झाले. ज्ञानोबारायांचे साहित्य समृध  होते, सामान्य जनतेला रुचेल, पटेल अशा भाषेत भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. साहित्य हा सोप्या पद्धतीने सादर करण्याचा विषय आहे. तोच वारसा शब्दगंध साहित्यिक परिषद पुढे चालवते आहे, सामान्य नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देत युवापिढी कडून साहित्य निर्मिती करून घेत आहे. नगर वरून आळंदी येथे शब्दगंध चळवळ आणली आता त्यांनी न थांबता आपले कार्य महाराष्ट्रभर उभे करावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

  यावेळी बोलताना उद्योजक फकीरा पवार म्हणाले, आपण खूप खडतर आयुष्य सोसून उभे राहिलो, आपल्याला घडवण्यासाठी आपल्या आई ने खूप काबाडकष्ट केले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी संयम ठेवून  सतत कार्यरत योग्य नियोजन करा व मोठी स्वप्ने पहा, एक आदर्शवत सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. शब्दगंध सोबत आपण जोडले गेलो आहोत,ही चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले. 

  यावेळी डॉ. कमलकांत वडेलकर बोलताना म्हणाले की, शब्दगंधची चळवळ आपण खूप जवळून पाहिली असून सुरुवातीच्या काळापासून आपण त्यांच्यासोबत आहोत, आज आधुनिकतेचा विचार मांडला आहे,तो खऱ्या अर्थाने नव महाराष्ट्राला गती देणार आहे. 

अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना राजेंद्र चोभें पाटील म्हणाले, श्री क्षेत्र नेवासा ते आळंदी हा अमृतानुभव मराठी भाषेला अधिक समृद्ध करणारा आहे, शब्दगंध  करीत असलेले कार्य महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी आळंदी हे ठिकाण निवडले आणि या माध्यमातून ही चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी शब्दगंध साहित्य संवाद कार्यक्रमाची संकल्पना मांडली व ती शब्दगंधच्या कार्यकारी मंडळांनी यशस्वी करून दाखवली.

  यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेस प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, प्रा .डॉ. अनिल गर्जे, बबनराव गिरी, राजेंद्र फंड, भगवान राऊत, मकरंद घोडके, प्रशांत सूर्यवंशी,राजेंद्र पवार, निखिल गिरी, भाग्यश्री राऊत, दिशा गोसावी, हर्षली गिरी, ऋषिकेश राऊत, स्नेहल रूपटक्के आदींनी प्रयत्न केले.

 मान्यवरांच्या हस्ते श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, दिगंबर गोंधळी, शिवाजी थीटे,प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. डॉ. श्रुतिका कानडे यांनी कथक नृत्यद्वारे गणेश वंदना सादर केली.  

या वेळी पुणे येथील उद्योजक  नानासाहेब शेळके, मारुती खडके, विठ्ठल  वरसमवाड, शिरीष थोरवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन झाले. प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले. प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने