मुंबई : दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना, ३२ वर्षीय ‘गोविंदा’चा मृत्यू; ३० जण जखमी


मुंबई :  मानखुर्द परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्र नगर येथे हंडी लावताना ३२ वर्षीय गोविंदा जगमोहन शिवकिरण चौधरी यांचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जगमोहन हे ‘बाल गोविंद पाठक’ या दहीहंडी पथकाशी संबंधित होते. त्यांच्या मृत्युमुळे उत्सवाचा उत्साह शोकात बदलला. मुंबई महापालिकेच्या (BMC) अहवालानुसार, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबईत दहीहंडीशी संबंधित अपघातांमध्ये ३० जण जखमी झाले आहेत.

कोठे किती जण जखमी व भरती?

कूपर रुग्णालय – १८ जण जखमी, यापैकी १२ जण भरती व ६ जणांना डिस्चार्ज

केईएम रुग्णालय – ६ जण जखमी, यापैकी ३ जण भरती व ३ जणांना डिस्चार्ज

नायर रुग्णालय – ६ जण जखमी, यापैकी १ जण भरती व ५ जणांना डिस्चार्ज

BMC चा मोठा निर्णय:

दरवर्षी दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदे जखमी होतात. यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे. आयुक्त भूषण गगरानी यांनी सर्व महापालिका रुग्णालयांना आदेश दिले आहेत की जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्यात यावेत.

त्याशिवाय, प्रत्येक तीन तासांनी रुग्णालयांना जखमींची माहिती आपत्कालीन नियंत्रण कक्षात पाठवावी लागेल, जेणेकरून परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल. मोठ्या दहीहंडी स्थळी वैद्यकीय पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.


थोडे नवीन जरा जुने