CP Radhakrishnan Vice President : भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजय मिळवला आहे. सी. पी. राधाकृष्णन हे भारताचे 17 वे उपराष्ट्रपती झाले आहेत. त्यांना एकुण 452 मते मिळाली. 2025 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.
एनडीएला लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या निवडणूक मंडळात स्पष्ट बहुमत असल्याने राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. विपक्षी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून जाहीर केले होते. मात्र, बिजू जनता दल (बीजेडी) आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तर वायएसआर काँग्रेसने एनडीएला पाठिंबा दिल्याने इंडिया आघाडीची 11 मते कमी झाली.
आज पार पडलेल्या निवडणूकीत एकुण 768 खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत मतदान झाले. एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला असून त्यांना एकुण 300 मते मिळाली. तसेच या निवडणूकीत इंडिया आघाडीचे 15 खासदारांची मते फुटल्याचे बोलले जात आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि उमेदवारी
17 ऑगस्ट 2025 रोजी भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. या निर्णयाची घोषणा जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत केली. राधाकृष्णन यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास
चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तमिलनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात झाला. त्यांनी कोयंबतूरच्या व्ही. ओ. चिदंबरम कॉलेजमधून व्यवसाय प्रशासनात (बीबीए) स्नातक पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा राजकीय प्रवास 1970 च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनसंघापासून सुरू झाला. 1974 मध्ये ते जनसंघाच्या तमिलनाडू राज्य कार्यकारिणीचे सदस्य बनले. त्यांनी तमिलनाडूत भाजपाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली, विशेषत: 2004 ते 2007 या काळात ते तमिलनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते.
वैयक्तिक जीवन आणि आवडी
राधाकृष्णन यांचा जन्म तमिलनाडूच्या तिरुप्पूर येथे सी. के. पोन्नुसामी आणि के. जानकी यांच्या पोटी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव आर. सुमती आहे. त्यांना कॉलेज जीवनात टेबल टेनिसमध्ये चॅम्पियनशिप मिळाली आहे, तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. त्यांना क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळण्याचीही आवड आहे.
C. P. Radhakrishnan is the 17th-new-Vice-President-of-India