मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (२ सप्टेंबर २०२५) जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, तसेच मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. यासाठी राज्यात सातत्याने आंदोलने सुरू होती. मनोज जरांगे पाटील यांनी २०२३ आणि २०२४ मध्येही अनेक उपोषणे, रास्ता रोको आणि मोर्चे काढले. यावर्षी २७ ऑगस्ट २०२५ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करत त्यांनी आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू होते.
आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो मराठा समाज बांधव आझाद मैदानावर जमले. या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातही मोठी गर्दी झाली. आंदोलकांनी "एक मराठा, लाख मराठा" आणि "आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही" अशा घोषणा देत आपला निर्धार व्यक्त केला.
सरकारनं मान्य केलेल्या मागण्या
1) हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी – कुळ, गाव, नात्यातील नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची मान्यता.
2) सातारा आणि औंध गॅझेटचा अभ्यास – कायदेशीर त्रुटी तपासून एका महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन.
3) आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे – सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जातील.
4) बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मदत व नोकरी – आठवड्यात १५ कोटी मदत खात्यात जमा होणार, तसेच एसटी महामंडळात नोकरीची तरतूद.
5) ग्रामपंचायतीत नोंदींचा रेकॉर्ड – जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दर सोमवारी बैठक घेऊन दाखले अर्ज निकाली काढण्याचा आदेश.
Manoj Jarange Patil-protest-great-success-demands-accepted-Maratha-Reservation