मोदी आमचे मित्र आहेत, पण --- डोनाल्ड ट्रम्प यांचे बदलते सूर?

 


वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील संबंधांना "अत्यंत विशेष नाते" असे संबोधत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कायम मैत्री राहील, असे सांगितले. मात्र, त्यांनी "सध्या मोदी काय करत आहेत त्याबद्दल" असमाधान व्यक्त केले.

ANI या वृत्तसंस्थेने "तुम्ही सध्या भारताशी संबंध नव्याने प्रस्थापित करायला तयार आहात का?" असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प म्हणाले,

"हो, मी नेहमीच तयार आहे. मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण मला सध्या ते जे करत आहेत ते फारसं आवडलेलं नाही. तरीही भारत आणि अमेरिका यांचे संबंध अतिशय खास आहेत. काळजी करण्यासारखं काहीच नाही. अशा काही क्षणिक गोष्टी घडतातच."

व्यापार करारांबाबत विचारले असता, ट्रम्प यांनी सांगितले की भारतासह इतर देशांशी चाललेले व्यापारविषयक वाटाघाटी चांगल्याच सुरू आहेत. मात्र, त्यांनी युरोपियन युनियनकडून गुगलला लावण्यात आलेल्या दंडावर नाराजी व्यक्त केली.

ट्रम्प म्हणाले,

"सर्व देशांशी आमचं चांगलं चाललंय. आम्ही युरोपियन युनियनवर नाराज आहोत – केवळ गुगलवरच नव्हे तर इतर अमेरिकन कंपन्यांबाबत जे चाललंय त्यावरूनही."

Truth Social वर ट्रम्प यांनी म्हटले होते की,"असं दिसतंय की अमेरिका भारत आणि रशियाला गमावलं आहे — तेही चीनकडे. त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा!" मात्र त्याबद्दल विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, "मला वाटत नाही की आपण भारताला गमावलंय. पण मी नाराज होतो की भारत रशियाकडून इतका तेल खरेदी करत आहे. मी त्यांना ते सांगितलं सुद्धा. आम्ही भारतावर ५० टक्के टॅरिफ लावलं होतं. तरीही माझं मोदींसोबत चांगलं नातं आहे. ते काही महिन्यांपूर्वीच इथे आले होते — आपण एकत्र प्रेस कॉन्फरन्स केली होती."

या पार्श्वभूमीवर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

MEA प्रवक्ते रंधीर जयसवाल म्हणाले,"भारत आणि अमेरिका यांचे संबंध आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे संबंध समान हितसंबंध, लोकशाही मूल्ये आणि मजबूत लोक-ते-लोक संबंधांवर आधारित आहेत."

"ही भागीदारी अनेक आव्हानांतून गेली आहे, तरीही ती टिकून राहिली आहे. आम्ही आमच्या धोरणात्मक अजेंड्यावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि ही भागीदारी परस्पर सन्मान व हितावर आधारितच पुढे जाईल अशी अपेक्षा आहे."

त्यांनी हेही स्पष्ट केलं की, "व्यापारविषयक मुद्द्यांवर भारत अमेरिकेशी सातत्याने संपर्कात आहे."

थोडे नवीन जरा जुने