काळभोरनगरमध्ये श्री हनुमान मित्र मंडळाकडून जिवंत देखाव्यांद्वारे समाजप्रबोधन..
पिंपरी चिंचवड :- चिंचवडमधील प्रतिष्ठित श्रीहनुमान मित्र मंडळ यंदा आपल्या चाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने समाजप्रबोधनपर कार्यक्रम आणि जिवंत देखावे यावर विशेष भर दिला आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत २७ ऑगस्टपासून ते ५ सप्टेंबरपर्यंत विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“बेटी बचाव बेटी पढाव”, “कुटुंब एकता”, “पाणी वाचवा देश वाचवा”, “वृद्धाश्रम”, “श्रीगणेश इच्छाशक्ती रात्री” अशा समाजजागृती करणाऱ्या विषयांवर विशेष प्रबोधनपर देखावे साकारले जात आहेत. तसेच लोककला, लोकनाट्याद्वारेही समाजमनावर ठसा उमटविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश आगमन सोहळ्याने झाली असून, समारोप ५ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. याचबरोबर सत्यनारायण महापूजन व दुग्धाभिषेक यांसारखे धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत.
“गणेशोत्सव हा फक्त भक्तीचा उत्सव नसून समाजाला योग्य दिशा देण्याचे एक प्रभावी व्यासपीठ आहे. त्यामुळे यंदाही समाजप्रबोधनाला प्राधान्य देत मंडळाने विविध उपक्रम राबवले आहेत,” असे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय गुप्ता यांनी सांगितले.