पिंपरी चिंचवडमध्ये आमदार लांडगे यांच्या वाढदिवसनिमित्त रक्तदान!



सोसायटी फेडरेशनचा आदर्श  : 470 रक्तदात्यांच्या सहभागाने समाजसेवेचे जपले व्रत


पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ५६९ नागरिकांनी नोंदणी केली, तर त्यापैकी ४७० पात्र रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा उज्ज्वल आदर्श घालून दिला.

सध्या पिंपरी चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना जीवदान मिळावे आणि शहरातील रक्तसाठा वाढावा, यासाठी सोसायटी फेडरेशनने हा सामाजिक उपक्रम राबवला. या शिबिरात शहरातील विविध सोसायट्यांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पुरुषांसह महिला रक्तदात्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

या उपक्रमामुळे फेडरेशनच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून, समाजहितासाठी संघटित प्रयत्नांचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे

पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, “आमच्या फेडरेशनने घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आम्ही आनंदित आहोत. पुरुषांसोबत महिला भगिनींचाही सक्रिय सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. रक्तदात्यांच्या या योगदानामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे. भविष्यातही समाजहिताचे, देशहिताचे असे विविध उपक्रम राबवण्याचा फेडरेशनचा संकल्प आहे.” या विक्रमी रक्तदान शिबिरामुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा नागरिकांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून, रक्तदात्यांच्या या उदात्त कार्याला सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 






प्रतिक्रिया : 

“पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील सर्व घटक—पुरुष, महिला, तरुण—सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला आणि विक्रमी रक्तदानाची नोंद घडवली. हे केवळ रक्तदान नाही, तर समाजातील ऐक्य, सहकार्य आणि मानवी संवेदनांचे प्रतीक आहे. फेडरेशन तर्फे सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आगामी काळातही आम्ही समाजहिताचे, जनजागृतीचे आणि राष्ट्रनिर्मितीला हातभार लावणारे अनेक उपक्रम राबवणार आहोत.”

- संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

थोडे नवीन जरा जुने