हिंदुभूषण क्रीडा महोत्सव-2025 : क्रीडापटूंचा उत्स्फूर्त सहभाग; क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद!



- आमदार महेश लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

- पुणे-पिंपरी-चिंचवडमधील 10 हजारांहून अधिक खेळाडूंची नोंद


पिंपरी- चिंचवड - आमदार महेशदादा लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त “हिंदुभूषण क्रीडा महोत्सव – 2025” या भव्य क्रीडा पर्वाला नागरिकांकडून अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत आहे. दि.10 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवात अवघ्या काही दिवसांत 10 हजारहून अधिक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत सहभाग नोंदवला आहे.

जिल्हास्तरीय मल्लखांब, कराटे, शूटिंग बॉल, किकबॉक्सिंग, कॅरम, तसेच राज्यस्तरीय स्वीमिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. भोसरीतील विविध भागांत महिला व पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धाही तुफान प्रतिसादात रंगल्या. यंदाच्या महोत्सवातील खास आकर्षण ठरलेली सोसायटी प्रीमियर लीग विशेष चर्चेत आहे. ४० वर्षांवरील नागरिकांनीही उत्साहाने मैदानात उतरत आपला क्रीडाप्रेमाचा जोश दाखवला आहे.

हा महोत्सव आयोजित करण्यामागील हेतू पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. विविध क्रीडा प्रकारांतून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्याची संधी खेळाडूंना मिळावी, हा उद्देश आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. भोसरीकरांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा स्थानिक क्रीडाविकासासाठी सकारात्मक दिशा दर्शवणारा असल्याचे मत क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.



आमदार महेश लांडगे यांच्या कार्याचा ठसा....

आमदार महेश लांडगे यांचा ५० वा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. कुस्ती आणि बैलगाडा यांच्या क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा असो किंवा भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, दोन्ही स्पर्धांचे यशस्वी आयोजन त्यांच्या नावावर आहे. त्यांनी उभारलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती व कबड्डी संकूल, शुटींग रेंज, बॅडमिंटन हॉल हे पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. शहराला स्पोर्ट्स सिटी बनवण्याचा संकल्प त्यांनी केला असून, त्याला साजेसा असा “हिंदुभूषण क्रीडा महोत्सव” यंदा उत्तुंग प्रतिसादात पार पडत आहे. भोसरीच्या क्रीडांगणांवर सुरू असलेली ही खेळांची मेजवानी पुढील काही दिवस अजून रंगत जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी दोघांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे, अशी माहिती क्रीडा महोत्सवाचे समन्वयक राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांनी दिली. 

प्रतिक्रिया : 

"हिंदुभूषण क्रीडा महोत्सवाला क्रीडापटूंनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्यासाठी अत्यंत समाधानाचा विषय आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक खेळाडूला योग्य संधी आणि सक्षम व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या तरुणाईने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी, हीच आमची प्रेरणा आहे. स्पोर्ट्स सिटी घडवण्याच्या दिशेने मिळणारा हा लोकसमर्थ प्रतिसाद आमचे पाऊल अधिक दृढ करणारा आहे."

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने