सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे आदर्श शिक्षक श्री दत्तात्रय वारे गुरुजी यांचा गौरव

 


जालिंदर नगर, ता. खेड : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने आदर्श शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ श्री दत्तात्रय वारे गुरुजी यांचा त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आज जालिंदर नगर, ता. खेड, जि. पुणे येथे भव्य स्वरूपात गौरव करण्यात आला.

हा सन्मान सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री किशोर थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अमित कोकणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री भगवान वायकर तसेच प्रसिद्ध कलाकार व संस्थेचे सदस्य श्री प्रमोद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

श्री दत्तात्रय वारे गुरुजी हे केवळ शिक्षक नसून ते एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, समाजप्रबोधक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून शिक्षणाला केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. विशेषतः जालिंदर नगर येथील शाळेचा त्यांनी केलेला कायापालट आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवत जगातील पहिल्या दहा शाळांमध्ये स्थान पटकावले, ही बाब भारताच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वलपणे उमटले आहे.

शैक्षणिक कार्यासोबतच वारे गुरुजींनी समाजातील वंचित, गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, नैतिक मूल्ये, संस्कार, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक जाणीव या सर्व बाबींमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले. समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, सामाजिक ऐक्य यांसारख्या विषयांवरही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.



यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारे गुरुजींच्या कार्याचा गौरव करत, “अशा शिक्षकांमुळेच देशाची भावी पिढी घडते आणि राष्ट्र प्रगतीपथावर जाते,” असे मत व्यक्त केले. संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वारे गुरुजी हे शिक्षण क्षेत्रातील एक चालते-बोलते विद्यापीठ असून त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर गौरव सोहळ्यामुळे शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रातील आदर्श मूल्ये अधोरेखित झाली असून, वारे गुरुजींचे कार्य पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

वारे गुरुजींच्या कार्याचे कौतुक सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे ,संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी केले व सदर सन्मान केल्याबद्दल संस्थेच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांचे सुद्धा कौतुक केले.

थोडे नवीन जरा जुने