पिंपरी चिंचवड दि.२९ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे पूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत आहे, सर्वसामान्य हातगाडी, स्टॉल धारकाना अजितदादांबद्दल आपुलकी वाटत होती. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समितीच्या वतीने आज केलेल्या आवाहनाला शहरातील विविध ठिकाणच्या हातगाडी, स्टॉल धारकानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने आपला व्यवसाय बंद ठेवला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये हॉकर्स झोन ही गरज आहे आणि या राबणाऱ्या हातगाडी, स्टॉल धारकांचे योग्य पुनर्वसन व्हावे ही त्यांची इच्छा होती. सन २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजितदादांच्या हस्ते फेरीवाला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्यमातून अनेक वेळा अजितदादा यांच्याशी भेटून कायदा अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
आज पिंपरी चिंचवड शहरातील अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या आठही प्रभागातील विक्रेत्यांनी आणि सर्व पदाधिकारी सभासद बांधव यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून शोक व्यक्त केला आहे.
