जुन्नर, (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील सावरगाव परिसरात आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर दगड व चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव बापुराव पाबळे (वय ६४, रा. पाबळवाडी, सावरगाव, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषीकेश काळुराम भगत (रा. खानापूर, सध्या नारायणगाव) याच्याविरुद्ध BNS 2023 कलम 109(1), 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता पाबळवाडी-सावरगाव रोडवरील चोहंडी ओढ्याजवळ ही घटना घडली. फिर्यादी पाबळे हे मोटारसायकलवरून जात असताना आरोपी झुडपातून बाहेर येऊन त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. त्यानंतर आरोपीने चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत पाबळे यांनी कसाबसा तेथून निघून एका व्यक्तीच्या मदतीने घरी पोहोचले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे उपचारासाठी दाखल केले.
या घटनेमागे दोघांमधील आर्थिक व्यवहार व चेक बाऊन्स प्रकरणातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपीकडून यापूर्वीही धमक्या देण्यात आल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.
सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे करीत असून पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.
.png)