पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी सेक्टर नंबर २२ चिकण चौक परिसरात आज एक धक्कादायक व थरारक घटना घडली. मानसिक अस्वस्थ आणि नशेत असलेल्या एका तरुणाने थेट हायटेन्शन वीज खांबावर चढून तब्बल तीन तास गोंधळ घातल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण नशेच्या अवस्थेत अचानक वीज खांबावर चढला आणि थेट टोकावर जाऊन बसला. त्यावेळी वीजपुरवठा सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. काही क्षणांतच ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
पोलीस व अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
वीजपुरवठा खंडित करून रेस्क्यू ऑपरेशन
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तत्काळ त्या भागातील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता खांबावर चढून त्या तरुणाला सुरक्षितरित्या खाली उतरवले. जवळपास अडीच ते तीन तास चाललेल्या या थरारक घटनेनंतर अखेर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे काही काळ निगडी परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी उपस्थित मान्यवर :
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनसोडे साहेब व त्यांची संपूर्ण टीम, अग्निशामक दलाचे उपआयुक्त दुर्वास साहेब, उपअग्निशामक अधिकारी गौतम किसन इंगवले, ऋषिकांत चिपाडे, विद्युत विभागाचे सर्व अधिकारी, पत्रकार बांधव तसेच परिसरातील आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
ही घटना घडत असताना त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रभागातील तरुण वर्ग रस्त्यावर उतरला होता. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत होता. अखेर तो तरुण सुखरूप खाली आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
सचिन तुकाराम चिखले
शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पिंपरी-चिंचवड शहर



