PCMC : सोसायटीधारकांच्या पाण्याचा खर्च बिल्डरांकडून वसूल करा!


सोसायटी फेडरेशनची मागणी : हमीपत्राचे उल्लंघन करणाऱ्यांना परवानगी रोखा

पिंपरी चिंचवड : शहरातील सोसायटीधारकांवर गेल्या अनेक वर्षांपासून पडत असलेल्या पाणीखर्चाच्या अन्यायकारक बोजाबाबत पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. 2019 पासून सोसायट्यांनी विकत घेतलेल्या पाण्याचा संपूर्ण खर्च संबंधित बांधकाम व्यवसायिकांकडून वसूल करण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अशी ठोस मागणी फेडरेशनने केली आहे.

फेडरेशनच्या मते, अनेक बांधकाम व्यवसायिकांनी प्रकल्प सुरू करताना सोसायट्यांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याची लेखी हमी दिली होती. मात्र प्रत्यक्षात या हमीपत्राचे सर्रास उल्लंघन करण्यात आले असून, त्याचा आर्थिक फटका थेट नागरिकांना बसला आहे. त्यामुळे हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून नागरिकांवरील आर्थिक अन्यायाचा गंभीर प्रकार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर, हमीपत्राचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांविरोधात गुन्हे दाखल करावेत, तसेच भविष्यात अशा व्यावसायिकांना कोणतीही नवीन बांधकाम परवानगी किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate) देऊ नये, अशी कडक भूमिका फेडरेशनने मांडली आहे.

फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “हमीपत्र देऊनही जबाबदारी न पाळणाऱ्या बिल्डरांना संरक्षण देणे म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणे होय. प्रशासनाने आता कठोर निर्णय घेतला नाही, तर ही प्रवृत्ती आणखी वाढेल.” या मागण्यांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, आता महानगरपालिका यावर कोणती ठोस कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


प्रतिक्रिया :

“सोसायटीधारकांनी 2019 पासून पाण्यासाठी भरलेला प्रत्येक रुपया हा त्यांच्या हक्काचा आहे. बांधकाम व्यवसायिकांनी दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करून नागरिकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे हा संपूर्ण खर्च संबंधित बिल्डरांकडून वसूल करून त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, नागरिकांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.” 

संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

थोडे नवीन जरा जुने