अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून होणारा पाणी पुरवठा शुद्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन आळंदी नगरपरिषद प्रशासना तर्फे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर यांनी केले आहे.
आळंदी शहरात जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीत मृतदेह आढळल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांत विश्वास निर्माण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि अधिकारी, पदाधिकारी यांनी जाहीर खुलासा केला आहे. आळंदी नगरपरिषदेने पत्रक प्रसिद्ध करून खुलासा जाहीर केला आहे. नागरिकांना होणारा पाणी पुरवठा हा नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून होत आहे. पाणी शुद्ध आणि ते पिन्या योग्य असल्याचे प्रशासनाने म्हंटले आहे.
आळंदी शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सध्या कार्यरत असलेल्या कोणत्याही टाकीत मृतदेह आढळलेला नाही. ज्या टाकीत मृतदेह सापडला आहे, ती नगरपरिषदेची अत्यंत जुनी आणि सध्या वापरात नसलेली बंद अवस्थेतील टाकी आहे. सद्या सुरु असलेल्या यंत्रणेचा आणि जुन्या पाणी पुरवठा टाकी यंत्रणेचा काहीही संबंध नाही. सध्याच्या पाणी पुरवठा योजनेवर कोणता ही परिणाम झालेला नाही. नागरिकांना पुरवले जाणारे पाणी नवीन जलशुद्धीकरण यंत्रणेतून पूर्णपणे शुद्ध, सुरक्षित आणि पिन्या योग्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ते बाबत नागरिकांनी काहीही शंका घेऊ नये. तसेच शहरात कोणत्या हि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आळंदी नगरपरिषद प्रशासन यांनी केले आहे.
जुन्या टाकीतील प्रकरणाचा पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे. नगरपरिषद पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करत आहे. नागरिकांनी सोशल मीडिया इतर माध्यमांतील अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत माहिती वरच विश्वास ठेवावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर यांनी केले आहे. या पुढील काळात जुन्या आणि वापरात नसलेल्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षितते साठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल असे आळंदी नगरपरिषद प्रशासनाने पत्रकातून जाहीर केले आहे.
