सांगली: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा झाली असून अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रल्हाद बोराडे (जामनेर,जळगाव)यांना महा. अंनिस समर्पित ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार, महा. अंनिस कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार धर्मराज चवरे ( मोहोळ,सोलापूर), महा अंनिस कृतिशील महिला कार्यकर्ती पुरस्कार ॲड मनिषा महाजन(आकुर्डी, पुणे) तर
महा अंनिस मधुरजग युवा प्रेरणा पुरस्कार सांगलीच्या अजय भालकर (इस्लामपूर,सांगली)यांना देण्यात येणार असल्याची माहिती महा अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी दिली.
संघटनेची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक अहिल्यानगर येथे दिनांक ५ ते ७ जून दरम्यान होत आहे.
सदरच्या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ संपादक व माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अहिल्यानगर येथील बडी साजन मंगल कार्यालय येथे होणार आहे.यावेळी महा अंनिस च्यावतीने जात मुक्ती करणाऱ्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात येणार आहे. गावचे सरपंच शरद आरगडे हा सन्मान स्वीकारतील.
स्वतःला झोकून देऊन अंधश्रद्धा निर्मूलनात कार्यरत असणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.मानपत्र,सन्मान चिन्ह,प्रत्येकी रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रल्हाद रामधन बोऱ्हाडे हे
जामनेर (जिल्हा जळगाव ) येथील असून २००७ पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रिय आहेत.त्यांनी जलसंपदा विभागात ३७ वर्षे सेवा केली आहे.२०१५ साली शाखा अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले.गेली दहा वर्ष पूर्ण अंनिस चे संघटनात्मक काम करीत आहेत.शाखा कार्यकर्ता,शाखा कार्याध्यक्ष ते जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अशी विविध संघटनां पदे भूषवली आहेत.जळगाव जिल्ह्यात संघटना वाढीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहे.शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांची त्यांनी मोठ्या प्रमाणात शिबिरे घेतली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी पथदर्शी काम केले आहे. यापूर्वी शतकवीर,लक्षवेधी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते.
धर्मराज चवरे हे मोहोळ (जिल्हा सोलापूर) येथील कार्यकर्ते आहेत.गेली ३० वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन च्या संघटित कामांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी स्वतः सत्यशोधकी विवाह केला होता,सोलापूर जिल्ह्यात अनेक सत्यशोधकी विवाह लावण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी सातत्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा त्यांचा हातखंड आहे. विविध सामाजिक विषयावर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत.सध्या ते सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून प्रभावी काम करीत आहेत.महा अंनिस अनेक उपक्रमात,आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.
प्राथमिक शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.
ॲड मनिषा महाजन या आकुर्डी पुणे येथील कार्यकर्त्या आहेत.गेली ३० वर्षे त्या महा अंनिस च्या कार्यात सक्रिय आहेत.संघटनेच्या लीगल सेलच्या राज्य कार्यवाह आहेत.
जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बाबत सातत्याने प्रबोधन करीत आहेत.अनेक बुवा बाबांचा त्यांनी पर्दाफाश केला आहे.सत्यशोधकी विवाह लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.अंनिस च्या कामाबरोबरच त्या नामवंत वकील म्हणून काम करतात.
अजय भालकर हे इस्लामपूर महा अंनिस चे कार्यकर्ते आहेत.गेली १५ वर्षे अंनिस कामात सक्रिय आहेत.शाखा कार्याध्यक्ष,सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ते अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे व्यवस्थापक संपादक अशी संघटनेतील वाटचाल झाली आहे.महाविद्यालयीन काळापासून ते सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे.अनेक पथनाट्ये,रिंगण नाट्यात सक्रिय सहभाग राहिलेला आहे.गाणी व पथनाट्याच्या त्यांनी कार्यशाळा घेतल्या आहेत. सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम हे गाजलेल्या रिंगण नाट्यात महत्वाची भूमिका राहिलेली आहे.
