पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या “धुळमुक्त शहर” या महत्त्वपूर्ण अभियानात सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री किशोर थोरात यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमांतर्गत आयोजित प्रभात फेरीत त्यांनी सहभागी होत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. तसेच निगडी येथील दुर्गा टेकडी उद्यान परिसरात काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या वेळी पर्यावरण संवर्धन, वाढते धूळप्रदूषण आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत जनतेला मार्गदर्शन करण्यात आले.
“धुळमुक्त शहर” हा उपक्रम प्राध्यापक नामदेवराव जाधव सर यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून, या अभियानात सामाजिक कार्यकर्त्या शलाका कोंडावार मॅडम यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आज या अभियानाची गरज का?
सध्या वाढते शहरीकरण, बांधकामे, रस्त्यांवरील धूळ आणि प्रदूषण यामुळे हवा प्रदूषित होत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून श्वसनाचे आजार, ऍलर्जी आणि इतर गंभीर समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे “धुळमुक्त शहर” ही केवळ मोहीम नसून आरोग्यदायी आणि स्वच्छ जीवनासाठी अत्यंत आवश्यक पाऊल आहे.
नागरिकांना आवाहन
या अभियानाच्या निमित्ताने श्री किशोर थोरात यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की,
“आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि धुळमुक्त ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. छोट्या-छोट्या कृतींमधून आपण मोठा बदल घडवू शकतो.”
शहर स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. चला, आपण सर्व मिळून “धुळमुक्त पिंपरी-चिंचवड” घडवूया.
