दादां’च्या स्मृतींना आणि कर्तृत्वाला अभिवादन; पिंपरी-चिंचवडमधील बारामतीकरांचा भव्य ‘कृतज्ञता मेळावा’


पिंपरी-चिंचवड : बारामती आणि पिंपरी-चिंचवड हे केवळ दोन भौगोलिक भाग नसून, ते एका अतूट नात्याने जोडलेले कुटुंब आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे, जनमानसात अढळ स्थान असलेले आदरणीय स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता, पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे ‘कृतज्ञता मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात दादांचे योगदान अतुलनीय आहे. आज दादा आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली विकासाची दिशा आणि सर्वसामान्यांसाठी लढण्याची जिद्द आपल्या प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. याच भावनेतून, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत. दादांच्या पश्चात ही केवळ राजकीय लढाई नसून, त्यांच्या विकासपरंपरेला पुढे नेण्याची एक भावनिक जबाबदारी आहे.

बारामती मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित या मेळाव्यास पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या सर्व बारामतीकर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि सुनेत्रावहिनींना बळ देण्यासाठी हे एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, दादांप्रती असलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही एक संधी आहे.

दादांनी या शहराला वैभव दिले; आता त्यांच्या विचारांना आणि वहिनींच्या नेतृत्वाला बळ देण्याची वेळ आली आहे, असे मत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आले. तसेच बारामती मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमधील सर्व बारामतीकरांनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती केली आहे.

आपले विनीत :
योगेश बहल
(शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर)
बारामती मित्र मंडळ, पिंपरी-चिंचवड शहर


थोडे नवीन जरा जुने