वाकड (पुणे) शिवानंद चौगुले: वेणूनगर येथील श्री दत्तकृपा ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि वेणूनगर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या वतीने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी केंद्राचे अध्यक्ष एम. रहाटे, उपाध्यक्ष राजेंद्र बडगुजर तसेच केंद्रातील सर्व ज्येष्ठ सदस्यांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.
कार्यक्रमात वरिष्ठ योग शिक्षक विजय जाजू यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद करताना शरीर, मन आणि बुद्धी संतुलित व निरोगी ठेवण्यासाठी नियमित योग व प्राणायाम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यंदाच्या "निरोगी वृद्धत्वासाठी योग" (Yoga for Healthy Ageing) या संकल्पनेचा संदेश घराघरांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा पवित्र संकल्प यावेळी करण्यात आला.
योग सत्रासाठी वरिष्ठ योग शिक्षिका सौ. सुरेखा रहाटे, योग शिक्षक रमेश नाकट तसेच योग शिक्षक राजाराम पवार उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.
या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
