!-- afp header code starts here --> देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष; रूपीनगर-तळवडेकर त्रस्त

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष; रूपीनगर-तळवडेकर त्रस्त

 


PCMC 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मोठ्या  प्रमाणात जमा करून टाकला जातो. देहूरोड बोर्डाकडे कचरा व्यवस्थापन नसल्यामुळे प्लास्टिक सह ओला सुका कचरा रूपीनगर आणि तळवडे परिसरा जवळ देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या मोकळ्या मैदानात टाकला जातो. वाऱ्यामुळे हा कचरा पिंपरी चिंचवड  मनपा हद्दीतील तळवडे रुपीनगर येथील करदात्या  नागरिकांच्या घरापर्यंत येतो, या कचऱ्याला आग लागते, त्यामुळे धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणाचा गंभीर त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

येथील नागरिकांनी सांगितले की, रुपीनगरच्या सीमा भिंत आणि मोकळ्या मैदानात  सर्व प्रकारचा ओला सुका आणि घातक कचरा सर्वत्र पसरलेला आहे. गेली काही वर्षे वारंवार तक्रारी करूनही  देहूरोड बोर्ड घन कचरा हाताळणी व्यवस्थापन कायद्यानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही. त्यामुळे  रुपीनगर तळवडे   येथील नागरिक आरोग्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.

कचऱ्यातील भंगार गोळा करणाऱ्या काही व्यक्ती कचऱ्याला आग लावत असल्याने परिसरात धुराचे लोट आणि दुर्गंधी पसरते. परिणामी, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून श्वसनविकारांसह विविध तक्रारी वाढत आहेत.

हा प्रश्न राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजला होता. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी नागपूर येथील अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूगाव आणि आळंदी येथील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मोशी कचरा डेपोवरील वाढता ताण आणि तीर्थक्षेत्र देहूगाव व आळंदीतील कचरा समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले होते.




स्थानिक नागरिकांच्या मते, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि देहूगाव नगरपंचायतीने आपल्या हद्दीतील कचऱ्याच्या शाश्वत विल्हेवाटीसाठी स्वतंत्र प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. मात्र, दोन्ही संस्थांकडे अद्याप सक्षम कचरा प्रक्रिया प्रकल्प नसल्याने कचरा उघड्यावर टाकणे आणि जाळणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेने देहूरोड बोर्डाला कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे रूपीनगर, तळवडे आणि आसपासच्या भागातील रहिवाशांच्या आरोग्य व पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.

याबाबत पालिकेने ठोस भूमिका घेवून कायम स्वरूपी कार्यवाही करावी. तसेच रूपीनगर मधील रहिवाशांच्या हद्दी लगतच्या भागातील प्लास्टिक व सुका कचरा गोळा करून नागरिकांना दिलासा द्यावा. सदरचे काम सफाई कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन स्वरूपात करण्यात यावे.अशी नागरिकांची मागणी आहे.

थोडे नवीन जरा जुने