- मुंबई येथे मंत्रालयात २२ जूनला विविध कामांचा आढावा
- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड -पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाशी संबंधित महसूल, वन विभाग, भूमी अभिलेख तसेच गावठाण हद्दीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना अखेर गती मिळणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी मंत्रालयात दोन महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठका आयोजित करण्यात आल्या असून, या बैठकीत शहरातील विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठका भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार सकाळी ११.०० वाजता महसूल व वन विभागाशी संबंधित विषयांवर बैठक होणार आहे. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील वनविभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, तसेच हिंजवडी ते नवी सांगवी नदी सुधार प्रकल्पाच्या अनुषंगाने खडकी, डुडुळगाव, चऱ्होली बुद्रुक आणि तळवडे येथील गावठाण हद्दीतील प्रश्नांवर चर्चा होणार आहे. यानंतर सायंकाळी ५.०० वाजता महसूल विभागाच्या बैठकीत भूमी अभिलेख विभागातील पिंपरी-चिंचवड नवनगर कार्यालयाशी संबंधित प्रकरणे, तसेच खडकी, डुडुळगाव, चऱ्होली बुद्रुक, चोवीसावाडी आणि तळवडे गावांच्या गावठाण हद्दीतील विविध प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.
दोन्ही बैठकींना आमदार महेश लांडगे यांच्यासह महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव, विशेष कार्य अधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, वन सचिव, भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे, निवासी उपजिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व विभागांना आवश्यक माहिती, अद्ययावत अहवाल आणि प्रलंबित प्रकरणांचा तपशील घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक विकास प्रकल्प विविध विभागांच्या मंजुरीअभावी किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे रखडले आहेत. विशेषतः वन विभाग, महसूल विभाग, भूमी अभिलेख, गावठाण हद्दी, नदी सुधार प्रकल्प आणि विविध विकास आराखड्यांशी संबंधित विषयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे सर्व प्रश्न एकाच व्यासपीठावर मांडून निर्णय प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रत्येक विषयाचा विभागनिहाय आढावा घेऊन प्रलंबित मंजुरी, प्रशासकीय अडथळे आणि आवश्यक कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात येणार आहेत. तसेच विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून रखडलेल्या विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाणार आहे. या बैठकीनंतर शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया :
"पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाशी संबंधित महसूल, वन विभाग, भूमी अभिलेख आणि गावठाण हद्दीतील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक विकासकामेही रखडली आहेत. त्यामुळे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत विविध विभाग एकाच व्यासपीठावर येत असल्याने अनेक प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय होतील, असा विश्वास आहे.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
