!-- afp header code starts here --> एसटी प्रवाशांना दिलासा! NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सवलती पूर्ववत सुरू राहणार

एसटी प्रवाशांना दिलासा! NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सवलती पूर्ववत सुरू राहणार

 


पुणे :  राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला अखेर १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, यामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करूनही त्यांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड प्राप्त झालेले नाही. तांत्रिक अडचणी, छपाई व वितरण प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, "एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. केवळ प्रक्रियात्मक किंवा तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही पात्र प्रवाशाला सवलतीपासून वंचित ठेवले जाणार नाही." या निर्णयामुळे अमृत ज्येष्ठ नागरिकांची मोफत प्रवास योजना, तसेच महिला व इतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ५० टक्के भाडे सवलत १ सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

एसटी महामंडळाने या कालावधीत ज्या प्रवाशांनी अद्याप NCMC स्मार्ट कार्ड काढलेले नाही, त्यांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. मुदतवाढ ही केवळ तात्पुरती असून, भविष्यात स्मार्ट कार्डच्या माध्यमातूनच सवलतींचा लाभ दिला जाणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

राज्यभरातील लाखो प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नियमित एसटी प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सवलतींचा लाभ अखंडितपणे सुरू राहणार असून, पात्र प्रवाशांना आवश्यक कागदपत्रांसह NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

— शिवानंद चौगुले

वार्ताहर, महाराष्ट्र जनभूमी न्यूज

थोडे नवीन जरा जुने