MGID Header Code
Code End

चऱ्होलीतील मूलभूत प्रश्नांसाठी सोसायट्यांची एकजूट !

 


पाणी, कचरा, रस्ते व क्रेशरच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर ; प्रशासनाकडून उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चऱ्होली :  चऱ्होली परिसरातील नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी परिसरातील सोसायट्यांचे पदाधिकारी एकवटले आहेत.प्रणम टॉवर्स सोसायटी, काळी भिंत,चऱ्होली येथे परिसरातील सुमारे १० सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, खराब रस्ते, रस्त्यांची दुरवस्था तसेच परिसरातील खडी क्रेशर मशीनमुळे होणारे प्रदूषण यांसह विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, बांधकाम साहित्य, माती व खडी रस्त्यावर पडत असल्याने रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.या समस्यांमुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन परिसरातील समस्या ठोसपणे मांडण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, प्रशासनाकडून योग्य कार्यवाही झाली नाही, तर परिसरातील सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी आणि नागरिकांना एकत्र करून लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.आवश्यक असल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला.ही केवळ एका सोसायटीची समस्या नसून संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठीची सामूहिक लढाई असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया-

चऱ्होली येथील काळी भिंत परिसरातील सुमारे १५ सोसायट्यांमधील सदस्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना मूलभूत सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत.ही अतिशय खेदाची आणि सोसायट्यांमधील सदस्यांच्या दृष्टीने काळजी करण्यासारखी स्थिती आहे. महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या समस्यांवर उपाययोजना कराव्यात.अन्यथा या भागातील सर्व नागरिक व सोसायटी सदस्यांना एकत्र करून लोकशाही मार्गाने आंदोलन तसेच रस्ता रोको करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्वच पक्षांच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना या सर्व सोसायट्यांमध्ये येण्यास मज्जाव केला जाईल.

संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली मोशी पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने