घरगुती कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा जनजागृती उपक्रम

ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा चार प्रकारांत वेगळा करण्याचे नागरिकांना आवाहन 

पिंपरी चिंचवड  : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. घरातून निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारांत विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीला देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

या अभियानांतर्गत शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. तसेच विविध परिसरांमध्ये जनजागृती उपक्रम आणि नागरिकांशी थेट संवाद साधून कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील कचरा विलगीकरण करून देणे आवश्यक आहे. ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा तसेच विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे जमा केल्यास त्यावर प्रक्रिया करणे सुलभ होते. यामुळे पुनर्वापराला चालना मिळते, कचरा प्रक्रिया अधिक परिणामकारक होते आणि लँडफिलवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होते, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात येत आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक घरातून कचऱ्याचे चार प्रकारांत योग्य विलगीकरण झाल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करावे. 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्रोतस्थळी कचरा विलगीकरण हा शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा मूलभूत टप्पा आहे. ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे दिल्यास कचरा प्रक्रियेला गती मिळते आणि स्वच्छ शहराच्या उद्दिष्टपूर्तीस मदत होते.” 

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, “महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात नागरिकांशी संवाद साधून कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून कचरा व्यवस्थापन व्यवस्था अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात आहे.”

थोडे नवीन जरा जुने