पिंपरी चिंचवड : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे फार मोठे मोलाचे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा पत्रकार पितांबर लोहार यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व -2026 निमित्त भक्ती शक्ती चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात 6 ऑगस्ट रोजी आयोजित निमंत्रित कवींच्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी सहभागी कवींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या वैविध्यपूर्ण बहारदार काव्य रचना सादर केल्या.
जेष्ठ कवी तथा पत्रकार पितांबर लोहार यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या काव्य संमेलनामध्ये कवी सुनील भिसे, किशोर केदारी, विशाल कसबे, अनिल दिक्षित,दीपेश सुराणा, सुहास घुमरे ,दत्तू ठोकळे, महेंद्र पाटोळे, आत्माराम हारे, संजय साळुंखे, विनोद अष्टूल,विलास रुपटक्के, पुरुषोत्तम हिंगणकर, विजय कांबळे, देवेंद्र गावंडे, अशोक टाकळे, अरूण कडलक, लहू साळवे, नितीन घोलप,कवयित्री फुलवती जगताप, आशा शहाणे, केसरताई लांडगे, वर्षा सोनवणे,नलिनी सोनवणे, राजेश्वरी म्हैसने,पिया सोनवणे, यांच्यासह आदी कवींनी आपल्या उत्कृष्ट रचना सादर केल्या.
पितांबर लोहार यांनी अण्णाभाऊची लेखणी ही कविता सादर केली.
त्यात ते म्हणतात,
संयुक्त महाराष्ट्राची खणी,
लाखात एक देखणी,
मुंबई महाराष्ट्राची शान सांगे,अण्णा भाऊ ची लेखणी.
अण्णाभाऊंची छक्कड
नि अनंत फदींचा फटका ,
लेखणीने भरवल्या
भल्या भल्यांच्या घटका.
सुनिल भिसे यांनी दीड दिवसाची शाळा नामक कविता सादर केली. त्यात ते म्हणतात, दीड दिवसाच्या शाळेने शिकवले फार काही, साहित्यातून त्यांनी उजळल्या दिशा दाही.
निवेदक तथा पत्रकार कवी किशोर केदारी यांनी समता ही कविता सादर करून प्रेक्षकाची वाहवा! मिळवली. ते आपल्या कवितेत म्हणतात, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे काय वर्णावी तुमची महती, चंद्र, सूर्य, हिरे, मोती, या सर्वांचेच तेज तुमच्या साहित्यापुढे फिके पडती.
कवीअनिल दीक्षित यांनी अण्णाभाऊंची लेखणी ही कविता सादर करून कवी संमेलांत रंगत आणली. ते आपल्या रचनेत म्हणतात, शृंगारिक लिहिताना दिसे नाजुक देखणी, दुःख व्यथा मांडताना जाई हळवी होऊनी
अशी लेखणी ,अण्णा भाऊंची लेखणी.
कवी सुहास घुमरे यांनी अर्थसत्ता ही कविता सादर केली. त्यात ते म्हणतात, अर्थसत्ता महासत्ता रामराज्य नांदणार, श्रीमंत झालो आम्ही सारे सुवर्ण युग येणार.
कवी तथा पत्रकार दीपेश सुराणा यांनी 'लोकशाहीर अण्णाभाऊंना मानाचा मुजरा' ही कविता सादर केली. त्यामध्ये ते म्हणतात, लाल बावटा खांद्यावरी घेत,
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात
गर्जला वाटेगावचा वाघ...
लोकशाहीर अण्णाभाऊंना मानाचा मुजरा..
कवी विशाल कसबे यांनी अण्णांच्या कविताना सलाम नामक कविता सादर केली. त्यात ते म्हणतात, शब्द नव्हते ते होते फक्त शब्दांचे हार,
अन्याया विरुद्ध उठलेले हुंकार.
कवी आत्माराम हारे यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील परिस ही रचना सादर केली, त्यात ते म्हणतात, दीड दिवसाची शाळा शिकून मुंबई गाठली पडेल ती कामे केली अण्णांनी लाज न बाळगली.
कवी दत्तू ठोकळे यांनी अण्णा ध्रुवतारा ही कविता सादर केली. त्यात ते म्हणतात, इतिहास सांगतो हा अण्णांची कहाणी, साहित्य संस्कृतीचे भरले खिश्यात पाणी.
कवयित्री फुलवती जगताप यांनी वालू आईच्या पोटी ही रचना सादर केली. त्यात त्या म्हणतात, ह्या वाळू आईच्या पोटी, जन्म घेऊनी अण्णा, धन्य झाला तुम्ही, ह्या धरती वरती.
कवी संजय साळुंखे यांनी पुतळे रडत राहतील ही कविता सादर केली. त्यात ते म्हणतात, इथल्या बाजार पेठा पूर्वी फक्त उत्सव, सणवार ला सजlवयlच्या यात या बाजारपेठा रोज महापुरुषाच्या नावानं सजवु लागल्या.
विनोद अष्टूल यांनी 16ऑगस्ट ओरडला नामक कविता सादर केली. त्यात ते म्हणतात, 16ऑगस्ट ओरडला तळपायाची आग मस्तकात शिरली, भडकलेली पोटाची आग डोळ्यात उतरली.
अशोक टाकळे यांनी गरिबांचे कैवारी शाहीर अण्णा भाऊ साठे ही रचना तर देवेंद्र गावंडे यांनी साहित्याची खान अण्णाभाऊ साठे ही रचना सादर केली.
पुरुषोत्तम हिंगणकर यांनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे ही रचना तर विजय कांबळे यांनी लढा आरक्षणाचा ही रचना सादर केली.
कवी महेंद्र पाटोळे यांनी अण्णाभाऊ वंदन तुजला नामक रचना सादर केली तर कवयित्री आशा शहाणे यांनी महिला तुझी कहाणी ही भावना प्रधान रचना सादर केली.
काव्यसंलनाचे अध्यक्षीय भाषण करताना पितांबर लोहार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान फार मोठे राहिलेआहे. पण त्यांनी लढ्याच्या वेळी माझी मैना गावाकड राहीली. या छक्कड मधून व्यक्त केलेली खंत आजही कायम आहे. कारण, त्यांची बेळगांव, कारवार, धारवlड रूपी मैना आज 65 वर्षानंतरही गावाकडेच राहिली आहे, ती मुंबईची, महाराष्ट्राची व्हायला हवीत, अशी अपेक्षा या वेळी त्यांनी व्यक्त केली.
कविसंमेलनाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी सुनील भिसे यांनी केले.बहारदार सूत्रसंचालन कवी तथा पत्रकार किशोर केदारी यांनी केले.तर आभार कवी विशाल कसबे यांनी मानले.
