जुन्नर, दि. २० (रफिक शेख) - पिंपळवंडी येथे १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने परिसरात भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तनीष्का व्यासपीठ, जुन्नर शहर व तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर पोलिसांसह तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळवंडी येथे २० ऑगस्ट २०२६ रोजी १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या अमानुष घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती, असंतोष आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप बालिकेवरील या गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली.
तनीष्का व्यासपीठ जुन्नर शहर व तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. उज्वला शेडाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनावर स्वाती टेकवडे, अमृता भगत, वैष्णवी चतूर, कविता छाजेड तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
