तनीश पार्कच्या पाणीप्रश्नाला अखेर दिलासा ; महापालिकेकडून पाणी कनेक्शन प्रस्तावास मंजुरी


फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश 

आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकारामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात

पिंपरी चिंचवड : तनीश पार्क सोसायटीच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाणी कनेक्शनच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक घडामोड झाली असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने तनीश पार्कसाठी पाणी कनेक्शनच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबतचे मंजुरीपत्र (Approval Letter) प्राप्त झाले असून, लवकरच प्रत्यक्ष पाणी कनेक्शनच्या कामाला सुरुवात होणार असल्याने रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली बिल्डर, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला. अनेक अडचणींवर मात करत पाणी कनेक्शनचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात यश आले. त्यामुळे भविष्यात तनीश पार्कमधील नागरिकांना नियमित आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कामासाठी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे रहिवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे. तसेच, या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मार्गदर्शन व सहकार्य करणारे आमदार पै. महेशदादा लांडगे यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

याशिवाय, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एकजुटीने सहकार्य करणाऱ्या तनीश पार्कमधील सर्व रहिवाशांचेही आभार मानण्यात आले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे पाणी कनेक्शनच्या मंजुरीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर तनीश पार्कच्या नागरिकांच्या दीर्घकाळापासूनच्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

"तनिष पार्क सोसायटी, बुरडेवस्ती-चऱ्होली येथे सुमारे १,८०० सदनिका असूनही गृहप्रकल्पाच्या विकसकाने महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी पाणी कनेक्शन उपलब्ध करून दिले नव्हते. परिणामी, हजारो रहिवाशांना अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विकसक,सोसायटीची व्यवस्थापन समिती आणि महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागासोबत सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला.त्यातून १ इंच व्यासाची तब्बल ४० नळ कनेक्शन मंजूर करून घेण्यात यश आले.या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तनिष पार्कचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असून,हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न सोडविणे, हीच हौसिंग सोसायटी फेडरेशनची भूमिका असून भविष्यातही अशाच पद्धतीने प्रत्येक सोसायटीच्या न्याय्य प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध राहू."

संजीवन सांगळे

अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने