MGID Header Code
Code End

आकुर्डी–थरमॅक्स चौक मार्गावर पावसाच्या पाण्याचा कहर; वाहतूक ठप्प

 

वाहनचालकांचे हाल; पाण्याचा तातडीने निचरा करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : (शिवानंद चौगुले) पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे आकुर्डी ते थरमॅक्स चौक या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अपेक्षित वेगाने निचरा होत नसल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहने बंद पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आकुर्डी–थरमॅक्स चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतुकीचा मार्ग असून या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत मुसळधार पावसानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने वाहनचालकांना अक्षरशः पाण्यातून वाहने घेऊन जावी लागत आहेत.

विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे किंवा इतर अडथळे स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पाण्यात वाहने बंद पडल्यास मागील बाजूस वाहनांची रांग लागून वाहतूक कोंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पावसाचे पाणी साचणे हा केवळ पावसाळ्यातील तात्पुरता प्रश्न न राहता शहरातील पाणी निचरा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे केवळ साचलेले पाणी काढण्यापुरती कार्यवाही न करता संबंधित ठिकाणी पाणी नेमके का साचते, पावसाळी गटारांची क्षमता पुरेशी आहे का, नाले व ड्रेनेज लाईनमध्ये अडथळे आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवावे. आवश्यकतेनुसार पाणी उपसा करणारे पंप, मनुष्यबळ व इतर यंत्रणा तैनात करून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.यासोबतच पावसाचे पाणी वारंवार साचणाऱ्या ठिकाणांची शहरव्यापी पाहणी करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी वर्षभर पाणी निचरा व्यवस्थेची देखभाल, गटारे व पावसाळी वाहिन्यांची साफसफाई आणि आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त निचरा व्यवस्था निर्माण करण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आकुर्डी–थरमॅक्स चौक मार्गावरील परिस्थितीची तातडीने पाहणी करून पाणी निचरा व वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सजग नागरिक शिवानंद चौगुले यांनी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने