रोजगारासाठी शहरात येणाऱ्या मजुरांची जबाबदारी सरकारने घ्यावी; कामगारांशी नखाते यांनी साधला संवाद
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतमजूर आणि कष्टकरी, कामगारांना बसत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये आलेल्या हजारो कामगारांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत केवळ रोजगार मेळावे घेण्याचे दिखावे न करता सरकारने स्थलांतरित कामगारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्या जगण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
दुष्काळामुळे शेतीतील उत्पन्न घटल्याने अनेक शेतमजूर आणि तरुण कामगार शहरांकडे रोजगारासाठी धाव घेत आहेत. मात्र, शहरात आल्यानंतरही त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. “दोन कोटी रोजगारांची आश्वासने दिली गेली; मात्र आज संकटात सापडलेल्या कामगारांना काम कोण देणार? ‘कोणी काम देता का काम?’ अशी आर्त हाक देणाऱ्या मजुरांचे प्रश्न लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजेत,” असे नखाते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमधील विविध कामगार नाक्यांवर आणि मजूर अड्ड्यांवर दररोज मोठ्या संख्येने कामगार रोजगाराच्या आशेने येतात. नखाते यांनी चिखली, चिंचवड, काळेवाडी, डांगे चौक या ठिकाणी कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना दिलासा दिला. स्थलांतरित कामगारांसाठी विशेष रोजगार अभियान राबवणे, उपलब्ध कामाच्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि संकटाच्या काळात त्यांना आवश्यक मदत देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रदेश संघटक भास्कर राठोड, उपाध्यक्ष राजेश माने, समाधान लोखंडे लाला राठोड, विनोद गवई,अनिता माने अंजना शिंदे आदी उपस्थित होते.
“दुष्काळामुळे गाव सोडून शहरात आलेल्या कामगारांना बोनस किंवा तात्पुरत्या घोषणांपेक्षा नियमित कामाची आणि रोजगाराची गरज आहे. त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि मूलभूत गरजा यांचा विचार करून सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. या कामगारांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ सातत्याने प्रयत्न करेल,” असे काशिनाथ नखाते यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया ------
शेतीचे पूर्ण नुकसान झाल्याने हाताला काम नाही म्हणून कामासाठी इकडे आलो - सदाशिव राठोड, यवतमाळ
आठवड्यापूर्वी पुणे येथे आलो तिकडे काम मिळत नाही म्हणून आता पिंपरी चिंचवड मध्ये आलो कामाच्या शोधात आहे काम उपलब्ध न झाल्यास अवघड होणार आहे -हरिभाऊ उघडे बुलढाणा
