MGID Header Code
Code End

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ भागांत संघाचे विजयादशमी पथसंचलन; नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत!

 


हजारो स्वयंसेवकांचा सहभाग; शिस्त, संघभावना आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन, भारतमातेच्या जयघोषाने शहर दुमदुमले!

पिंपरी चिंचवड | वार्ताहर : शिवानंद चौगुले | महाराष्ट्र जनभूमी न्यूज

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रभक्ती, शिस्त, संघभावना आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमी पथसंचलने पिंपरी-चिंचवड शहरातील २७ भागांत मंगळवारी (दि. २० ऑक्टोबर) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या पथसंचलनांमध्ये हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन, घोषपथकाचा लयबद्ध निनाद आणि भारतमातेच्या जयघोषाने शहरातील विविध परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेले. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वयंसेवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

शहरातील दापोडी, वाल्हेकरवाडी, रावेत, हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, वाकड, थेरगाव, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, संत तुकारामनगर, संभाजीनगर, पूर्णानगर, यमुनानगर-निगडी आणि चिखलीसह विविध भागांत पथसंचलने काढण्यात आली. देहू व देहूरोड परिसरात रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) पथसंचलने पार पडली होती. तर आकुर्डी, डुडुळगाव आणि मोशी परिसरात सायंकाळी नियोजित मार्गांवर संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

शिस्तबद्ध संचलनाने वेधले नागरिकांचे लक्ष!

हातात दंड, अंगावर संघाचा पूर्ण गणवेश आणि घोषपथकाच्या तालावर एकाच लयीत मार्गक्रमण करणाऱ्या स्वयंसेवकांच्या संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. संचलनाच्या अग्रभागी फडकणारा भगवा ध्वज, घोषपथकाचा निनाद आणि स्वयंसेवकांची शिस्त यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी नागरिकांनी भगव्या ध्वजावर व स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रमुख अतिथी आणि लोकप्रतिनिधींनीही काही ठिकाणच्या पथसंचलनांना उपस्थिती लावली.

संघाच्या शताब्दी वर्षामुळे विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रहित, सामाजिक एकात्मता, सेवा, समर्पण आणि संघटनशक्ती या मूल्यांचा संदेश देणाऱ्या पथसंचलनातून स्वयंसेवकांनी शिस्त आणि सामूहिक कार्याचे दर्शन घडविले.

पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उत्सवाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. विजयादशमीच्या मंगलमय पर्वावर आयोजित या पथसंचलनांमुळे शहरात राष्ट्रभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला. शिस्त, संघभावना आणि राष्ट्रसेवेचा संकल्प अधोरेखित करणाऱ्या या पथसंचलनांनी विजयादशमी उत्सवाला विशेष रंगत आणली.

— वार्ताहर : शिवानंद चौगुले

महाराष्ट्र जनभूमी न्यूज

थोडे नवीन जरा जुने