अविधवा नवमीला चिंचवडमध्ये धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी चिंचवड | वार्ताहर : शिवानंद चौगुले
पितृपक्षातील अविधवा नवमी या दिवशी चिंचवड गावात संजीवन समाधी घेतलेल्या श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या सुविद्य पत्नी उमामाता यांचा स्मृतिदिन भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदा या स्मृतिदिन महोत्सवाचे २८वे वर्ष असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. मोरया गोसावी तसेच त्यांचे चिरंजीव थोर गणेशभक्त चिंतामणी महाराज यांच्या जीवनकार्याशी उमामाता यांचे महत्त्वपूर्ण नाते मानले जाते.
अविधवा नवमीच्या दिवशी दुपारी ठीक १२ वाजता श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातील अष्टभुजा देवीची ओटी मंगलमूर्ती वाड्याचे प्रमुख विश्वस्त महाराज देव यांच्या पत्नी देव वहिनी यांच्या हस्ते भरण्यात येते. त्यानंतर ‘उमामाता की जय’ या जयघोषात भाविक व सभासद मंदिराला प्रदक्षिणा घालतात. पुढे चिंचवड गावातील श्रीराम मंदिरात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्रीसूक्त पठण आणि भजनी मंडळाची भजनसेवा होते. महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच स्त्रीशक्ती, संस्कार व प्रबोधनावर व्याख्यानाचे आयोजन केले जाते. मोरया गोसावींची पदे धुपारती मंडळ व मोरयाभक्तांकडून सादर केली जातात.
महोत्सवाच्या आदल्या रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामरक्षा पाठांतर, वक्तृत्व, आरती आदी स्पर्धा घेतल्या जातात. धुपारतीनंतर विजेत्या विद्यार्थी व महिलांना बक्षिसांचे वितरण केले जाते. तसेच लकी ड्रॉद्वारे पाच महिलांना साडी प्रसाद दिला जातो आणि उपस्थित भाविकांना शिरा प्रसादाचे वाटप केले जाते.
गेल्या २८ वर्षांपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून हा महोत्सव श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपत आहे. या महोत्सवाला आतापर्यंत अनेक नामवंत व्याख्यात्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. भाविकांकडून मिळणाऱ्या देणगीतून या महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामुळे उमामाता स्मृतिदिन हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता चिंचवडच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि नव्या पिढीला संस्कारांची जोड देणारा उपक्रम ठरला आहे.
— महाराष्ट्र जनभूमी न्यूज
वार्ताहर : शिवानंद चौगुले
