पिंपरी-चिंचवड | वार्ताहर : शिवानंद चौगुले
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक, प्रांत मुख्य मार्ग कार्यकर्ते तसेच जिल्हा व प्रांत स्तरावर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारे आदरणीय संदिपदादा जाधव यांचे मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री अंदमान येथे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. सहलीसाठी अंदमान येथे गेले असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सामाजिक, संघटनात्मक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
संदिपदादा जाधव हे कल्याण जनता सहकारी बँकेत रिजनल जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. बँकिंग क्षेत्रातील जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी सामाजिक आणि संघटनात्मक कार्यातही स्वतःला झोकून दिले होते.
देव, देश, धर्म आणि सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे संदिपदादा हे संघटन कौशल्य, सेवाभाव, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि निष्ठा यांचा आदर्श संगम होते. अनेक वर्षे त्यांनी जिल्हा आणि प्रांत स्तरावर संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
'निर्मल वारी'च्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य
'निर्मल वारी'चे जनक म्हणून त्यांनी सुरू केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. वारकरी परंपरेतील पावित्र्य जपत स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. हजारो कार्यकर्त्यांना एका विचाराने आणि ध्येयाने जोडण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती.
तसेच 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' येथे ४११२ ढोलवादकांनी एकत्रितपणे सादर केलेली ऐतिहासिक मानवंदना हा त्यांच्या संकल्पनेतून आणि नियोजन कौशल्यातून साकारलेला अविस्मरणीय उपक्रम ठरला. त्यांच्या दूरदृष्टीची आणि अथक परिश्रमांची साक्ष देणारा हा उपक्रम त्यांच्या कार्याची कायम आठवण करून देत राहील.
संदिपदादांच्या आकस्मिक निधनाने केवळ एक निष्ठावंत स्वयंसेवकच नव्हे, तर सामाजिक, सहकार आणि संघटनात्मक क्षेत्राला दिशा देणारा अनुभवी मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.
महाराष्ट्र जनभूमी न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
संदिपदादा जाधव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल महाराष्ट्र जनभूमी न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबीयांसह सर्व सहकारी व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!
अंत्ययात्रा गुरुवार ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० घरापासून निघेल व ९.३० वाजता अंत्यविधी नेहरूनगर स्मशानभूमी येथे होणार आहे याची नोंद घ्यावी.
