प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी पिंपरी-चिंचवडमधील कष्टकरी फेरीवाल्यांवर अन्याय; तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार थांबवले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा
पिंपरी चिंचवड : शहरातील टपरी, पथारी, हातगाडी धारक आणि कष्टकरी फळभाजी विक्रेत्यांना हक्काचे गाळे व व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, यासाठी आता नुसत्या बैठकांचा देखावा न करता ठोस आणि कृतीशील निर्णय घेण्यात यावा, अशी आक्रमक भूमिका पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समितीच्या सदस्या व टपरी-पथारी-हातगाडी पंचायतीच्या मुख्य संघटिका सौ. आशा बाबा कांबळे यांनी मांडली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फेरीवाला समितीच्या बैठकीनंतर त्यांनी स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक काढून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या उदासीन धोरणावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे.
२३ वर्षांचा प्रदीर्घ लढा आणि प्रशासकीय चालढकल
टपरी, पथारी, हातगाडी पंचायत आणि राष्ट्रीय फेरीवाला समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली २००३ पासून पिंपरी-चिंचवडमधील फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू आहे. २०२६ मध्ये या ऐतिहासिक लढ्याला २३ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, आजही शहरातील फेरीवाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. फेरीवाला समितीच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या; त्यामध्ये जागा निश्चितीबाबत केवळ चर्चाच झाल्या, पण प्रत्यक्ष कृती शून्य राहिली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीतही केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कोणताही ठोस निर्णय झाला नाही. जुन्याच मुद्द्यांना उजाळा देऊन केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप सौ. आशा कांबळे यांनी केला आहे.
प्रशासन आणि राजकीय नेत्यांवर कठोर टीका
महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढताना सौ. कांबळे म्हणाल्या की, "एकीकडे महापालिका प्रशासन अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली कष्टकरी फळभाजी विक्रेते आणि महिला-पुरुष फेरीवाल्यांना उद्ध्वस्त व विस्थापित करत आहे, तर दुसरीकडे फेरीवाला समितीच्या बैठकांमध्ये त्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नाही. प्रशासकीय चालढकल आणि राजकीय नेत्यांची उदासीनता याला पूर्णपणे कारणीभूत आहे. फेरीवाल्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे हे धंदे आता बंद करावेत."
डॉ. बाबा कांबळे यांचा ऐतिहासिक संघर्ष आणि कायद्याची पायमल्ली
या लढ्याचा इतिहास अधोरेखित करताना सौ. आशा कांबळे यांनी सांगितले की, २००५ साली पिंपरी-चिंचवड शहरात सर्व टपरी-पथारी धारकांवर अन्याय करून त्यांचे परवाने (लायसन्स) रद्द करण्यात आले होते. त्या अन्यायाविरुद्ध डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून मोठा जनसंघर्ष उभारला गेला. या प्रदीर्घ लढ्याचे फलित म्हणून २००७ मध्ये देशातील पहिला फेरीवाला कायदा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मंजूर करून घेण्यात डॉ. बाबा कांबळे यांना यश आले.
आज देशातील इतर अनेक महानगरपालिकांनी फेरीवाला कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली असताना, ज्या पिंपरी-चिंचवड शहरातून या कायद्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, तीच महानगरपालिका आज या बाबतीत सर्वात मागे पडली आहे. केवळ अधिकारी वर्ग आणि स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नसल्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी रखडली आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
मागासवर्गीय, विधवा व कष्टकरी महिलांच्या हक्कांसाठी कटिबद्ध
आपली भूमिका स्पष्ट करताना सौ. आशा बाबा कांबळे म्हणाल्या की, "मला पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी फेरीवाल्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. ज्या घटकांनी माझ्यावर विश्वास टाकून निवडून दिले, त्यांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. शहरात विशेषतः मागासवर्गीय, परित्यक्ता, विधवा आणि गरीब कष्टकरी फळभाजी विक्रेत्या महिलांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांच्यावर दररोज मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करून त्यांना हक्काची जागा आणि गाळे मिळवून देण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे."
प्रशासनाने या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा व गाळे बांधणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा संपूर्ण शहरातील कष्टकरी फेरीवाल्यांना सोबत घेऊन महापालिकेविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा खणखणीत इशारा सौ. आशा बाबा कांबळे यांनी दिला आहे.
आशा बाबा कांबळे
सदस्या, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती
मुख्य संघटिका, टपरी पथारी हातगाडी पंचायत
