संस्कार, शिस्त, अध्यात्म आणि राष्ट्रनिष्ठेतूनच सुरक्षित समाजाची निर्मिती!
शिवाजीनगर न्यायालय, पुणे येथे नुकत्याच घडलेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप आणि उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र, केवळ घटनेचा निषेध करून किंवा दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करून आपली सामाजिक जबाबदारी संपत नाही. मुळात अशा घटना घडतातच का? समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामागची कारणे कोणती? आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपण काय करणार आहोत? या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
गुन्हेगारीचा उद्रेक एका दिवसात होत नाही; त्यामागे अनेकदा बालपणापासून विकसित होत गेलेली मानसिकता, चुकीचे संस्कार, संगत आणि सामाजिक वातावरण कारणीभूत असते. आज अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही दादागिरी, धमकावणे, मारामारी, दुसऱ्यांचा अपमान करणे, व्यसनांचे आकर्षण आणि हिंसक प्रवृत्तीची लक्षणे दिसून येत आहेत. अल्पवयीन मुलांचा विविध गुन्ह्यांमधील सहभाग ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नसून ती समाजाच्या भवितव्याशी निगडित असलेली गंभीर बाब आहे.
आपल्या संस्कृतीत एक म्हण आहे, 'मूलाचे पाय पाळण्यात दिसतात.' या म्हणीचा अर्थ प्रत्येक बालकाला गुन्हेगार ठरवणे असा नसून, बालपणातील वर्तनातील चुकीची लक्षणे वेळीच ओळखून योग्य दिशा देणे हा आहे. एखादे मूल वारंवार आक्रमक होत असेल, इतरांना त्रास देत असेल, खोटे बोलत असेल, हिंसेचे समर्थन करत असेल किंवा चुकीच्या संगतीत रमू लागले असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच संवाद, समुपदेशन आणि आवश्यक ते मार्गदर्शन मिळाले तर अनेक समस्या गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच रोखता येऊ शकतात.
यासाठी सर्वप्रथम पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांकडे मुलांसाठी वेळ कमी होत चालला आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे, गुणांकडे आणि भौतिक सुविधांकडे लक्ष दिले जाते; मात्र त्यांच्या मानसिकतेकडे, मित्रपरिवाराकडे, भावनिक गरजांकडे आणि दैनंदिन वर्तनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. मुलांना महागड्या वस्तू, मोबाईल आणि सुविधा देणे म्हणजे पालकत्व नव्हे. त्यांना योग्य-अयोग्याची जाणीव करून देणे, शिस्त लावणे, जबाबदारी शिकवणे आणि चूक झाल्यास ती समजावून सांगण्याचे धैर्य दाखवणे हे खरे पालकत्व आहे.
मुलांवर केवळ बंधने लादून किंवा सतत धाक दाखवून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत नाही. त्यांना आपले मन मोकळेपणाने व्यक्त करता आले पाहिजे. त्यांच्या अडचणी ऐकून घेणारे, चुका झाल्यास समजून सांगणारे आणि योग्य वेळी ठामपणे मर्यादा घालणारे पालक त्यांना मिळाले पाहिजेत. प्रेम आणि शिस्त यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. मुलांचे अति लाड करणे आणि त्यांच्या प्रत्येक चुकीचे समर्थन करणे भविष्यात घातक ठरू शकते.
भारतीय संस्कृती ही केवळ धार्मिक विधी आणि परंपरांपुरती मर्यादित नाही; ती जीवन जगण्याची मूल्यव्यवस्था आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा विश्वकल्याणाचा विचार, जगद्गुरू शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान, संत परंपरेतील मानवतेचा संदेश आणि आपल्या थोर राष्ट्रपुरुषांनी दिलेले चारित्र्यनिर्मितीचे संस्कार हे समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. 'सर्वे भवन्तु सुखिनः' आणि 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले' हा विचार प्रत्येकाच्या आचरणात उतरला पाहिजे. मानवता, सहिष्णुता, संयम, परस्पर आदर आणि बंधुभाव ही मूल्ये केवळ भाषणांत न राहता आपल्या व्यवहाराचा भाग बनली पाहिजेत.
आज समाजाची एक मानसिकताही तपासण्याची गरज आहे. गोड गोळ्या सहज चावून खाल्ल्या जातात; परंतु कडू औषध मात्र घशाखाली उतरवताना त्रास होतो. जीवनातही आपण सोयीस्कर आणि आनंददायी गोष्टी स्वीकारतो; पण शिस्त, संयम, त्याग, जबाबदारी आणि आत्मपरीक्षण यांसारख्या कठीण वाटणाऱ्या मूल्यांकडे दुर्लक्ष करतो. संकटांचा सामना करण्याची मानसिक तयारी आणि चुकीच्या गोष्टींना ठामपणे नकार देण्याची वृत्ती बालपणापासून रुजवली पाहिजे.
शाळा आणि शिक्षणव्यवस्थेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत गुण मिळवणे किंवा पदवी संपादन करणे नव्हे. शिक्षणातून चारित्र्य, विवेक, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम निर्माण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना इतिहास, भारतीय संस्कृती, संत साहित्य, महापुरुषांचे विचार, संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक शिक्षण यांची ओळख करून दिली पाहिजे. शाळांमध्ये केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा व्यक्तिमत्त्व विकास, समूहकार्य, क्रीडा, योग, ध्यान, समुपदेशन आणि बालसंस्कार उपक्रमांना प्राधान्य मिळाले पाहिजे.
याच संदर्भात गुरुकुल शिक्षणपद्धतीच्या मूलभूत तत्त्वांचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. गुरुकुल म्हणजे केवळ जुन्या शिक्षणपद्धतीकडे परत जाणे नव्हे; तर आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच चारित्र्यनिर्मिती, आत्मसंयम, गुरुजनांविषयी आदर, निसर्गाशी नाते आणि समाजाप्रती कर्तव्यभावना यांचा समन्वय साधणे होय. आधुनिक शिक्षणाला संस्कारांची जोड मिळाली तरच ज्ञानाबरोबर विवेक असलेली पिढी निर्माण होईल.
समाजातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. बालसंस्कार वर्ग, व्याख्यानमाला, युवक प्रबोधन, कुटुंब प्रबोधन, व्यसनमुक्ती अभियान, सामूहिक प्रार्थना, सेवाकार्य आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार अशा उपक्रमांतून समाजाची मानसिकता घडवता येऊ शकते. मात्र, हे उपक्रम केवळ उत्सव किंवा औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित राहता कामा नयेत. त्यांचे सातत्य आणि प्रत्यक्ष परिणाम महत्त्वाचे आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजात रुजविण्याचा प्रयत्न होत असलेले 'पंचपरिवर्तन' हे याच दृष्टीने महत्त्वाचे आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा आग्रह आणि नागरी कर्तव्यपालन या पाच विषयांचा स्वीकार केवळ संघटनात्मक कार्यक्रम म्हणून न करता प्रत्येक कुटुंबाने आणि नागरिकाने आपल्या जीवनात केला पाहिजे. कुटुंब सुसंस्कृत झाले, समाज समरस झाला, नागरिक कर्तव्यदक्ष झाले आणि राष्ट्रहिताची भावना प्रबळ झाली, तर समाजातील अनेक समस्यांवर सकारात्मक परिणाम घडू शकतो.
मात्र, येथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते की राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसेवा या केवळ घोषणा देण्याच्या गोष्टी नाहीत. त्या आपल्या दैनंदिन आचरणातून सिद्ध झाल्या पाहिजेत. आपल्या मुलांना राष्ट्रपुरुषांचा इतिहास सांगणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, कायद्याचा आदर करणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे, महिलांचा सन्मान करणे आणि समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हीसुद्धा राष्ट्रसेवाच आहे.
याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरक्षित वातावरण, अल्पवयीन मुलांसाठी समुपदेशन, सायबर माध्यमांवरील हिंसक व दिशाभूल करणाऱ्या आशयाबाबत जागरूकता, व्यसनमुक्ती आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुरुवातीच्या लक्षणांवर योग्य हस्तक्षेप आवश्यक आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याने कठोर कारवाई झालीच पाहिजे; परंतु त्याचबरोबर गुन्हेगारी निर्माण होण्याची सामाजिक कारणे दूर करण्यावरही भर दिला पाहिजे.
आज गरज आहे ती केवळ गुन्हेगारांना शिक्षा देण्याची नाही, तर उद्याचा गुन्हेगार निर्माण होऊ नये यासाठी आजच्या बालकावर योग्य संस्कार करण्याची!
प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसाठी वेळ द्यावा, प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्यावे, प्रत्येक सामाजिक संस्थेने संस्कारक्षम पिढी घडविण्याचा संकल्प करावा आणि प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारावी. कारण सुसंस्कृत समाजाची निर्मिती ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, मुलांच्या हातात केवळ मोबाईल नव्हे, तर संस्कारांचे विचार द्या; मनात केवळ स्पर्धा नव्हे, तर सहकार्याची भावना निर्माण करा; डोक्यात केवळ यशाची स्वप्ने नव्हे, तर कर्तव्याची जाणीव रुजवा!
राष्ट्र बलवान होण्यासाठी केवळ सीमांचे रक्षण करणारे सैनिक पुरेसे नाहीत; तर चारित्र्यसंपन्न, विवेकी, शिस्तप्रिय आणि राष्ट्रनिष्ठ नागरिकही आवश्यक आहेत. अशा नागरिकांची निर्मिती बालपणापासूनच झाली पाहिजे.
चला, आजपासूनच संकल्प करूया... संस्कारक्षम बालपण, सुसंस्कृत कुटुंब, सजग समाज आणि समर्थ राष्ट्रनिर्मितीचा
संपादकीय : शिवानंद चौगुले | महाराष्ट्र जनभूमी न्यूज
