श्रींचे पालखी सोहळ्यांचे आळंदीत जोरदार स्वागत होणार; श्रींचे पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडींचा प्रथमच होणार सन्मान
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आळंदीत साजरा होत आहे. या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाच्या पावन पर्वावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांचे निमंत्रणाचा स्वीकार करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैभवी पालखी सोहळा रविवार ( दि.२० ) सायंकाळी पाचचे सुमारास आळंदीत हरिनाम गजरात एक दिवसाचे मुक्कामासाठी प्रवेशनार आहे. या ऐतिहासिक संतभेटीचे साक्षीदार व्हा आणि या अनुपम सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी आळंदी देवस्थानचे निवेदन अर्जास प्रतिसाद देत श्रींचे पालखी सोहळ्याचा मार्ग बदलून देहू ला जाताना आळंदी मार्गे जाण्याचा तसेच एक दिवस आळंदीत मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे वारकरी संप्रदाय आणि समस्त आळंदीकर ग्रामस्थानी स्वागत केले असुन सोहळ्याचे वैभवी परंपरेस साजेल असा पाहुणचार आणि स्वागत करण्यास तयारी सुरु केली आहे. समस्त काळेवाडी ग्रामस्थ आणि आळंदी ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिकांचे वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आळंदी काळेवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज धाकट्या पादुका विसावा स्थान येथे दोन्ही पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. श्रींचे सोहळ्यातील संस्थानचे तसेच पालखी सोहळ्याचे पदाधिकारी, मालक, चोपदार, मानकरी, बैलसेवेचे मानकरी यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनात समस्त काळेवाडी ग्रामस्थ, आळंदी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वारकरी भाविक यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच विशेष सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रथ सेवेच्या बैलजोडीचा सत्कार, सन्मान, पूजा, पुरणपोळी महानैवेद्य आणि झूल घालून प्रथमच आळंदीत करण्यात येणार आहे.
या बाबतचे सर्व नियोजन झाले असल्याचे सेवेकरी माऊली भक्त प्रकाश काळे यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ) आळंदीतील विविध सेवाभावी संस्था, मंडळे यांचे वतीने देखील श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरेने करण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन हरिनाम गजरात पिंपरी, चिंचवड, लांडेवाडी, भोसरीमार्गे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट विसावा घेत आळंदीत श्री संत धाकट्या पादुका मार्गे आळंदीत समाज आरती नंतर एक दिवसाचे मुक्कामासाठी श्रींचा वैभवी सोहळा आळंदीत विसावणार आहे. या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.