Rajiv Gandhi Katraj Zoo : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या काही दिवसांत १६ चितळ हरणांचा (Spotted Deer) मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या रहस्यमय मृत्यूंची कारणे शोधण्यासाठी प्राणी संग्रहालय प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत. या घटनेमुळे प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात गेल्या आठ दिवसांत कोणत्याही लक्षणांशिवाय पंधरा चितळांचा मृत्यू झाला आहे. मृत चितळांच्या शरीराचे अवयव आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी देशभरातील प्रमुख प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले की, मृत्यूंची कारणे शोधण्यासाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तपास करत आहे. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन अहवाल लवकरच प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, प्राण्यांच्या आहार आणि राहणीमानाची काळजी घेतली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे की, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या काही दिवसांत १४ हरणांचा मृत्यू झाला. ही घटना चिंताजनक आहे. हरिणांचे मृत्यू नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाले? त्यांच्या आहार तथा इतर बाबींची योग्य ती काळजी घेतली नाही का याबाबत सखोल चौकशी होण्याची गरज आहे. माझी महापालिका आयुक्त, पुणे यांना विनंती आहे की कृपया आपण सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
प्राणी संग्रहालयाची पार्श्वभूमी
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे १३० एकर क्षेत्रावर विस्तारलेले असून, येथे ६० प्रजातींचे सुमारे ४३० प्राणी आहेत. यामध्ये सिंह, वाघ, बिबट्या, हरण, गवा, साप आणि पक्ष्यांचा समावेश आहे. १९९९ मध्ये पेशवे पार्क येथील छोट्या प्राणी संग्रहालयाचे कात्रज येथे स्थलांतर झाले आणि त्यानंतर याला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. दरवर्षी सुमारे २२ लाख पर्यटक या प्राणी संग्रहालयाला भेट देतात, ज्यामुळे हे पुण्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
Death-of-16-deer-causes-stir-at-Katraj-Zoological-Park-in-Pune