पुणे : सीतेच्या जन्मापासून ते पृथ्वीवर पुनरागमनापर्यंतचा शक्तिशाली प्रवास एकपात्रीतून सादर


 ..आणि सीतेचा जीवन प्रवास उलगडला रंगमंचावर

पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी (एफटीएस) संस्थेच्या एकल महिला समितीच्यावतीने "सीता" या एकपात्री शोचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली होती. या प्रसंगी मा. नगरसेवक मनीषा लडकत, अर्चना बेहेडे, अंजली तापडिया, शोभना परांजपे,  किरण मंत्री, रचना भुतडा नेहा लद्दड तसेच एकल महिला समितीच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. 

बेंगळुरू येथील एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध, असलेली एकपात्री कलाकार अंजना चांडक यांनी सीतेच्या जन्मापासून ते पृथ्वीवर तिच्या अंतिम पुनरागमनापर्यंतच्या शक्तिशाली प्रवास एकपात्रीतून सादर केला. प्रभू श्रीराम यांची पत्नी, राजा जनक यांची कन्या अशी ही जानकी (सीता) तिची रामायणातील प्रभू श्रीरामसोबतचा १४ वर्षांचा वनवास याची देही याची डोळा रसिकांनी अनुभवला. सीतेचा शांत स्वभाव, संयमी, अढळ आणि दृढनिश्चय यामुळेच सीता ही अजरामर ठरली आहे. सदरील एकपात्री प्रयोगातून सीतेचा प्रवास उलगडण्यात आला. 



फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी (एफटीएस) ही स्वयंसेवी संस्था आहे जी संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना मूलभूत शिक्षण देण्यासाठी  काम  करते. त्यांच्या  एकल विद्यालय उपक्रमाद्वारे,एफटीएस ४ ते १० वर्षे वयोगटातील मुलांना अनौपचारिक प्राथमिक शिक्षण प्रदान करते.प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते तिसरी मधील २५ ते ३० मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना बिहाणी यांनी केले तर आभार नेहा लद्दड यांनी मानले. 

अधिक माहितीसाठी संपर्क- रामकुमार शेडगे – जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस -९८९०७७५६९६

थोडे नवीन जरा जुने