सारंगी करंजावणे हिची डर्ट ट्रॅक स्पर्धेत दमदार कामगिरी; पुणे फेस्टिवलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला

 


पुणे – 37व्या पुणे फेस्टिवल डर्ट ट्रॅक स्पर्धेत पिंपरी-चिंचवडची सारंगी करंजावणे हिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. केवळ 13 दिवसांच्या सरावावर तिने अनुभवात व वयात मोठ्या असलेल्या स्पर्धकांना मागे टाकत ही यशस्वी झेप घेतली.

गंगाधामजवळील चोरडिया मैदानावर पार पडलेल्या या चित्तथरारक स्पर्धेत राज्यभरातून 225 स्पर्धक सहभागी झाले होते. पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक अभय छाजेड यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला, तर बक्षीस वितरण नितीन चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. ‘रोडीज अ‍ॅडव्हेंचर’चे अमरेंद्र साठे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘मोटर्स क्लब ऑफ इंडिया’ची या स्पर्धेला मान्यता लाभली होती.

सारंगीला नॅशनल चॅम्पियन आकाश सातपुते आणि एक्स-टीव्हीएस फॅक्टरी रायडर राहीलेट यांचे मार्गदर्शन लाभले. धाडसी व बहुपरिचित रायडर असलेल्या तिचे वडील सचिन करंजावणे हे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर रायडिंगचा अनुभव लाभलेले आहेत. तिची आई संजना करंजावणे या मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा आहेत. घरातून मिळणाऱ्या उत्तम पाठबळामुळे आणि आजी-आजोबांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे सारंगीने हे यश मिळवले.



सारंगीच्या या कामगिरीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकला आहे. मुलींच्या सशक्तीकरणासाठी सारंगीने एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून, अशाच प्रकारे तिला पुढेही प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेतर्फे देण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने