मुंबई : राज्यात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ करिता सोयाबीन, उडीद आणि मूगाच्या हमीभावाने खरेदीसाठी ३० ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवार १८ नोव्हेंबरपर्यंत दोन लाख २० हजार ३१६ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत होणाऱ्या खरेदीदरम्यान बारदान्याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यंत्रणांना दिले.
पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत खरेदी प्रक्रिया आणि बारदाना उपलब्धतेसंदर्भात आढावा घेण्यात आला. प्रधान सचिव प्रवीण दराडे, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सहसचिव विजय लहाने, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम हे प्रत्यक्ष तर पणन संचालक, नाफेड आणि एनसीसीएफचे राज्यप्रमुख ऑनलाईन उपस्थित होते.
खरेदी केंद्रांसाठी शासनास ७२५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी ७१३ केंद्रांना शासनाने मान्यता दिली असून ५७९ केंद्र नाफेड/ एनसीसीएफने मंजूर केले आहेत. यापैकी ४८४ केंद्र कार्यान्वित झाले आहेत. मागील हंगामातील ५६२ केंद्रांच्या तुलनेत या हंगामात खरेदी केंद्रांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या केंद्रांवर १८ नोव्हेंबरपर्यंत ५२८ लाभार्थी शेतकऱ्यांकडून ११ हजार ९९ क्विंटल खरेदी झाली आहे. यावर्षी सोयाबीनसाठी १८ लाख ५० हजार ७०० मे.टन, मूग साठी ३३ हजार मे.टन तर उडीद साठी तीन लाख २५ हजार ६८० मे.टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केंद्र शासनाने या हंगामासाठी सोयाबीनचे आधारभूत दर ५३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केले आहेत. यात मागील हंगामापेक्षा ४३६ रुपयांनी वाढ झाली आहे. मूगाचे दर ८७६८ रुपये प्रति क्विंटल असून या दरात ८६ रुपयांची वाढ झाली आहे. तर, उडीद चे आधारभूत दर ७८०० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आले असून यामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
खरेदी प्रक्रिया राबविण्याकरीता केंद्र शासनाच्या नाफेड व एनसीसीएफ यांच्यावतीने राज्याच्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई, विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे या तीन नोडल संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. या संस्थांमार्फत १५ नोव्हेंबर २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२६ या ९० दिवसांच्या कालावधीत खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता किंवा गैरव्यवस्थापन टाळण्याच्या दृष्टीने दक्षता पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेऊन खरेदी केंद्रांची संख्या आवश्यकतेनुसार वाढविण्याचे त्याचप्रमाणे खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यासाठी गोडाऊन्सची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे यासाठी लागणाऱ्या बारदानाचा पुरवठा वेळेवर होण्यासाठी तात्काळ मागणी नोंदविण्याचे निर्देश दिले.
