डॉ. किशोर खिल्लारे यांना भावपूर्ण आदरांजली


पुणे : दिनांक 24 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता पुणे येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने डॉ. किशोर खिल्लारे यांचे दुःखद निधन झाले. ही अचानक आलेली बातमी सामाजिक, राजकीय तसेच आरोग्य क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांना मोठा धक्का देऊन गेली. ज्यांनी आयुष्यभर हजारो लोकांचे प्राण वाचवले, कोरोनाच्या भीषण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून असंख्य रुग्णांची सेवा केली, त्यांना बरे केले, मनोधैर्य दिले—अशा योद्ध्याचा असा अनपेक्षित अंत मनाला चटका लावणारा आहे.

डॉ. किशोर खिल्लारे यांची सार्वजनिक जीवनातील वाटचाल विद्यार्थी दशेपासूनच सुरू झाली. एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेतून त्यांनी सामाजिक भानाची पायाभरणी केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विविध सामाजिक चळवळींत सक्रिय राहिले. जाती-अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) चे दीर्घकाळ जिल्हा समिती सदस्य म्हणून त्यांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने काम केले.

वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात त्यांनी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड येथे विविध पदांवर काम करत असंख्य गोरगरीब, कष्टकरी जनतेचे प्राण वाचवले. कामगार, शोषित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या कामात ते नेहमी अग्रभागी राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दिनांक 2 डिसेंबर रोजी एस.एम. जोशी सभागृह येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजली सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉ. किरणताई मोघे होत्या, तर सूत्रसंचालन अॅड. विशाल जाधव यांनी केले.

या सभेस सिटूचे केंद्रीय कमिटी सदस्य कॉ. शुभा शमीम, कॉ. प्रा. अजित अभ्यंकर, कॉ. गणेश दराडे (जिल्हा सचिव), डॉ. महारुद्र डाके, डॉ. ज्ञानेश्वर मोठे, तसेच एस.एफ.आय.चे महाराष्ट्र राज्य सचिव सोमनाथ निर्मळ यांसह विविध सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. खिल्लारे यांच्या पत्नी प्रा. आशा खिल्लारे, मुली, जावई, बंधू आणि कुटुंबीयही या प्रसंगी उपस्थित होते.

डॉ. किशोर खिल्लारे यांनी समाजासाठी जे कार्य केले, त्यांची लोकसेवा, त्याग, विचार आणि मूल्ये पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी ठरतील. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.



थोडे नवीन जरा जुने