PCMC : महानगरपालिकेत ‘गाडगेबाबा’ अवतरले; १५० व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन


पिंपरी चिंचवड (शिवानंद चौगुले) - महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्य इमारतीत आज संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात अभिवादन करण्यात आले. स्वच्छतेचा आणि समाजप्रबोधनाचा अखंड संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या स्मृतिदिनी महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर मा. श्री. यशवंत गंगाराम कन्हेरे यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.

महापालिकेच्या तळमजल्यावर आयोजित कार्यक्रमात मा. उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सांस्कृतिक विभागाचे अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले (वार्ताहर – महाराष्ट्र जनभूमी), विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमा पवार यांच्या शुभहस्ते बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी कृतज्ञ अभिवादन केले.

प्रसंगी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी गाडगेबाबांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांची आठवण करून दिली — “स्वच्छता हीच खरी सेवा आहे,” तसेच “अंधश्रद्धा, अज्ञान आणि अस्वच्छता दूर केली तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होईल,” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, स्वच्छता आणि समानतेचा संदेश पोहोचवणाऱ्या बाबांचे कार्य आजच्या काळात अधिकच मार्गदर्शक ठरत असल्याचेही सांगण्यात आले.


कार्यक्रमादरम्यान सर्वांनी एकत्रितपणे “गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला” हे भजन म्हणत भक्तिमय वातावरणात बाबांना अभिवादन केले. यशवंत कन्हेरे हे गाडगेबाबांच्या वेशात उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. त्यांच्या साध्या वेशभूषेमुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. अनेकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढत या अनोख्या क्षणाची आठवण जपली.

राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेत साकारलेला हा उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता स्वच्छता, समाजजागृती आणि सेवा यांचा संकल्प दृढ करणारा ठरला. बाबांच्या कार्यातून प्रेरणा घेत “स्वच्छ शहर, सुंदर शहर” या ध्येयासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

थोडे नवीन जरा जुने