पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक १८, केशवनगर, चिंचवड येथे चैतन्य मेडीको जवळ व उद्यम सहकारी बँक समोर असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या चौकात गेल्या दोन महिन्यांपासून चेंबरला मोठे व धोकादायक खड्डे पडले आहेत. या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
ही बाब महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वारंवार आणून देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित अधिकारी नेमके कोणत्या कामात व्यस्त आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखादा मोठा अपघात होण्याची किंवा जीवितहानीची वाट पाहिली जात आहे काय, असा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मधुकर बच्चे (भारतीय जनता पार्टी महामंत्री) यांच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी नागरिकांसह संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान चौकातील परिस्थिती अत्यंत भयानक असल्याचे निदर्शनास आले. मुख्य रस्ता व मुख्य चौक असतानाही मधोमध एवढा मोठा खड्डा दोन महिन्यांपासून कायम आहे, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे.
आजपर्यंत ज्या नागरिकांना अपघातामुळे इजा झाली, उपचारासाठी खर्च करावा लागला, त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. मधुकर बच्चे यांनी संबंधित विभागाला या गंभीर परिस्थितीची माहिती दिली असून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत या ठिकाणी आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घ्यावे व जनतेच्या भावना व सुरक्षिततेशी खेळ करू नये. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मधुकर बच्चे यांनी दिला आहे.

