पिंपरी चिंचवड : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स, चिंचवड यांच्या वतीने संस्थेच्या 19 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय “ प्रतिभा सृजन व्याख्यानमाला -2025” दिनांक सात ते नऊ डिसेंबर या कालावधीत संध्याकाळी पाच ते सात वाजता चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ, विचारवंत, उद्योगपती, कला व साहित्य क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींची व्याख्याने या व्याख्यानमालेतून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना प्रेरणा देणार आहेत.
प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. 7 ,रोजी दीपस्तंभ फाउंडेशन चे संपादक संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांचे ‘याला जीवन ऐसे नाव’ या विषयावर व्याख्यान देऊन गुंफणार आहेत. दिनांक आठ रोजी प्रेरक वक्ते गणेश शिंदे यांचे ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान ऐकण्याची संधी मिळणार आहे. तर दि 9 रोजी ‘चला उभारू नवी पिढी’ या विषयावर दैनिक लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानमालेचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी विचार, सृजनशीलता, व्यावहारिक ज्ञान, तसेच नेतृत्व कौशल्य विकसित करणे हा आहे. शैक्षणिक प्रगतीसोबत समाजघडणीत विद्यार्थ्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, यासाठी या व्याख्यानमालेची संकल्पना रचण्यात आली आहे.
दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचा 19 वा वर्धापन दिन येत असल्यामुळे या दिवशी व्याख्यानाबरोबरच ‘प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार 2025’ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना देण्यात येणार असून त्यांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक, सचिव डॉ दीपक शहा यांनी दिली. या पुरस्कार सोहळ्यास पुण्यभूषण फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत
“विद्यार्थ्यांनी पुस्तकापुरते शिक्षण न शिकता प्रत्यक्ष जीवनातील कौशल्ये आत्मसात केली तरच ते खऱ्या अर्थाने ‘प्रतिभावान’ ठरतात या अमूल्य हेतूने प्रेरित होऊन प्रतिभा सृजन व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिभा शैक्षणिक संकुलामार्फत करण्यात येत आहे.
