पिंपरी चिंचवड : येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला. संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या आरोग्य समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
भोसरी येथील रेड प्लस ब्लड बँकचे डॉ. इंदर जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १८५ जणांनी रक्तदान केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात २४५ जणांनी सहभाग घेतला. डॉ. पी. के. शिंदे, डॉ. मुजम्मील उस्मानी, सपना शिंदे, डॉ. सेजल आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्ततपासणी, मधुमेह, सी.बी.सी., तोंडाचा कर्करोग, थायरॉईड, ईसीजी व रक्तगट तपासणी केली. या शिबिराला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील सर्व विभागप्रमुख, कार्यक्रम समन्वयक, अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा व संचालिका डॉ. तेजल शहा यांनी आरोग्य समितीसमवेत प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्यासह उपस्थित राहून सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बोलताना डॉ. दीपक शहा म्हणाले, “तुमची उपस्थिती व प्रोत्साहन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आपल्या आरोग्याला व कल्याणाला प्राधान्य दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.”
या उपक्रमासाठी विभागप्रमुख डॉ. श्रुती गणपुले, उपप्राचार्या व समन्वयिका डॉ. जयश्री मुळे, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य संयोजिका डॉ. चारुशिला पाटील, आरोग्य समिती प्रमुख व एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार तसेच प्रा. सुप्रिया गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
