भाजपाचा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित




- आमदार महेश लांडगे यांची भावूक प्रतिक्रिया 

- पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला निर्विवाद बहुमत

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज जाहीर होत असलेल्या निकालांकडे पाहता, पिंपरी-चिंचवडकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर ठाम विश्वास व्यक्त केला असून, भाजपचा एकहाती महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांन आम्ही साद घातली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 च्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले होते. मागील काही दिवसांपासून शहरात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू होती. आज निकालावरुन पिंपरी-चिंचवडची जाणती व स्वाभिमानी जनता भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागांवर विजय मिळाला आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 37, शिवसेना शिंदे गटाला 6 आणि अपक्ष 1 असे संख्याबळ आहे. भाजपा आणि शिंदे गट युती झाल्यास भाजपा महायुतीने 91 जागांवर विजय मिळवल्याचे स्पष्ट होते. 

यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, “देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदर्शी नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. 

तसेच, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार उमा खापरे, विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. भाजपा 



कार्यकर्त्यांचे मानले आभार... 

तसेच पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आणि नेत्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचा हा सन्मान आहे. घराघरात जाऊन केलेला संवाद, लोकांशी निर्माण केलेला विश्वास आणि संघटनात्मक ताकदीमुळेच आज हे यश शक्य झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णतः कटिबद्ध असून, नागरिकांनी दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने जपला जाईल. महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामांचा वेग वाढवून पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनवण्याचा संकल्प भाजप निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. 

प्रतिक्रिया:

विकासाभिमूख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक आहे. आगामी काळात शहराच्या शाश्वत विकासासाठी मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पित भावनेतून काम करण्यासाठी मी व माझे सहकारी कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर म्हणून एकजुटीने काम करण्याचे आवाहन करतो. 

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने