पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस स्व. अजित पवार यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रांगणात पूर्णाकृती पुतळा उभारावा – योगेश बहल

 


मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - शहराच्या सर्वांगीण विकासात स्वर्गीय अजितदादा पवार यांचे मोलाचे योगदान लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस “स्व. अजितदादा पवार भवन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका” असे नामकरण करण्यात यावे तसेच त्या इमारतीच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी भावना शहरातील नागरिकांची आहे.

सन १९९२ ते २०१७ या कालावधीत औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ, सुंदर व सर्व सुखसोयींनी युक्त असे अग्रगण्य शहर म्हणून नवी ओळख मिळवून देण्याचे कार्य स्व. अजितदादा पवार यांनी केले. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी शहरासाठी उपलब्ध करून देण्यात आला. त्या माध्यमातून प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, झोपडपट्टीवासीयांसाठी पक्की घरे, पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर, प्रेक्षागृहे, उद्याने, व्यायामशाळा, रुग्णालये, मुलींचे आयटीआय आदी विकासकामे मार्गी लागली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड शहरास ‘बेस्ट सिटी अवॉर्ड’ प्राप्त झाला.

शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता विद्यमान महानगरपालिका इमारत अपुरी पडत असल्याने, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी नवीन, प्रशस्त व अत्याधुनिक प्रशासकीय इमारत उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. या इमारतीच्या डिझाईन व इन्फ्रास्ट्रक्चरच्या संकल्पनेत स्व. अजितदादा पवार यांचे मोठे योगदान होते.

मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यामुळे शहरवासीयांच्या वतीने आदरांजली म्हणून त्यांचे नाव अजरामर राहावे, या भावनेतून नवीन प्रशासकीय इमारतीस “स्व. अजितदादा पवार भवन” असे नामकरण करण्यात यावे व प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने करण्यात आली आहे.

ही मागणी पुढील मान्यवरांकडे करण्यात आली आहे –

मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. श्री. अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभे

मा. श्री. श्रीरंग अप्पा बारणे, खासदार, मावळ

मा. श्री. महेश लांडगे, आमदार, भोसरी

मा. श्री. शंकर जगताप, आमदार, चिंचवड

मा. श्री. अमित गोरखे, आमदार, विधानपरिषद

मा. श्रीमती उमा खापरे, आमदार, विधानपरिषद

मा. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

थोडे नवीन जरा जुने