संत निरंकारी मिशन कडून चऱ्होली–देहू–आळंदीत महास्वच्छता अभियान

 


पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी ४२ ठिकाणी जलस्वच्छता मोहीम उत्साहात

आळंदी (अर्जुन मेदनकर): चऱ्होली, देहू आणि आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या घाटांवर महास्वच्छता अभियान राबवत जलसंवर्धन व स्वच्छतेसाठी संत निरंकारी मिशनने विशेष योगदान दिले. ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील तब्बल ४२ ठिकाणी एकाच दिवशी जलस्वच्छता मोहीम पार पडली.

या उपक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रवी लांडगे (महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छतेत सक्रिय सहभाग नोंदविला व नदीतील साचलेला कचरा, प्लास्टिक व औद्योगिक सांडपाण्याची पाहणी केली.

महापौर लांडगे यांनी इशारा देत सांगितले की, महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाणी व औद्योगिक कचऱ्यास जबाबदार कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.

‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत देशव्यापी अभियान

परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता जी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत संपूर्ण देशभर १६०० हून अधिक ठिकाणी हे अभियान एकाच वेळी राबविण्यात आले. पुणे जिल्ह्यात इंद्रायणीसह मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांबरोबरच विविध तलावांवर स्वच्छता मोहीम पार पडली.

भोसरी विभागाच्या वतीने चऱ्होली, देहू व आळंदी येथे घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. या वेळी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक तसेच विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसहभागातून नदीसंवर्धन

इंद्रायणी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे महापौर लांडगे यांनी नमूद केले. भविष्यात अशा मोहिमांना अधिक गती व प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात करण्यात आली. “पाणी हे केवळ साधन नसून जीवनाचा आधार आहे,” हा संदेश समाजात रुजविणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बाह्य स्वच्छतेसोबतच अंतर्मन शुद्धीचा संदेश देणारा सत्संगही यावेळी आयोजित करण्यात आला.

या मोहिमेत सात मावळे संवर्धन संस्था, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने