महाराष्ट्र राज्य ठरले पहिले राज्य
मुंबई - (वर्षा चव्हाण) : राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनने कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय पातळीवर अशा प्रकारचा समन्वयित आणि विशेष टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र राज्य ठरले पहिले राज्य आहे.
या टास्क फोर्सवर कृषी धोरण तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी रफिक नाईकवाडी (संचालक, विस्तार व प्रशिक्षण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे, सोनाली शिळकर हे शासकीय सदस्य म्हणून तर सृष्टी डोईजड या अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
एकात्मिक हस्तक्षेपावर भर
या टास्क फोर्समार्फत शेतकरी आत्महत्यांची आर्थिक, सामाजिक व मानसिक कारणमीमांसा, हवामान बदलाचे परिणाम, अल्पकालीन व दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजना आणि एकात्मिक हस्तक्षेप मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. विभागीय व जिल्हास्तरावर अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करून विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधला जाणार आहे.
‘पिरॅमिड मॉडेल’चे जनक
डॉ. विनायक हेगाणा यांनी शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विकसित केलेल्या ‘पिरॅमिड मॉडेल’द्वारे आणि ‘शिवार संसद’ व ‘शिवार हेल्पलाइन’ या उपक्रमांतून आतापर्यंत २,४९८ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केल्याचा दावा केला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीही त्यांनी विशेष कार्य केले आहे.
नुकतेच त्यांना स्वित्झर्लंडमधील डंस्टर बिझनेस स्कूलकडून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली असून, हा सन्मान मिळवणारे ते देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक ठरले आहेत. तसेच ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठेच्या Chevening Awards पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
अधिक सक्षम शेतकरी घडविण्याचा प्रयत्न
“शेतकरी आत्महत्या हा केवळ नुकसानभरपाईचा विषय नसून शेतकऱ्याला अधिक सक्षम बनविण्याचा व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे. कृषी विभागातील विविध योजनांचा इतर विभागांशी समन्वय साधून उत्पादनवाढीसोबत उत्पन्नवाढ साध्य करण्यासाठी हा टास्क फोर्स महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.
टास्क फोर्सचे अध्यक्ष रफिक नाईकवाडी यांनी सांगितले की, “यापूर्वी विविध समित्यांनी केलेल्या अभ्यासांचा आढावा घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार व्यापक आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाईल.
दरम्यान, डॉ. विनायक हेगाणा यांनी सांगितले की, “राज्यस्तरीय पातळीवर शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक काम करण्याची ही मोठी संधी आहे. शाश्वत, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून प्रभावी मॉडेल उभे करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी समन्वयित आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजनांना गती मिळेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
