पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 


जयंती निमित्त शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) :- छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते, तर स्वराज्य, लोककल्याण, न्याय आणि सुशासनाचे तेजस्वी प्रतीक होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही आपल्याला आत्मसन्मान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देते. त्यांनी सर्वधर्मसमभाव, स्त्रीसन्मान तसेच शेतकरी व प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या या मूल्यांची जोपासना करणे हीच आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच पीएमटी चौक भोसरी, लांडेवाडी चौक, पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर तथा नगरसदस्य योगेश बहल, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, नगरसदस्या वर्षा जगताप, माजी नगरसदस्य मारुती भापकर, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, लिपिक अभिजित डोळस यांच्यासह भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भक्ती शक्ती समूह शिल्प उद्यान, प्रेमलोक पार्क चिंचवड, थेरगाव येथील डांगे चौक, थेरगाव गावठाण, रहाटणी, पिंपरी वाघेरे गावठाण, कासारवाडी मनपा शाळा, दापोडी येथील दापोडी चौक तसेच फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नगरसदस्य संजय काटे, राजू बनसोडे, नगरसदस्या माई काटे, सविता खुळे, अर्चना तापकीर, आरती चौंधे, प्रतिक्षा जवळकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

मोहननगर, चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांनी तर मोशी येथील पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

थोडे नवीन जरा जुने